वादळी पावसामुळे भातशेती भुईसपाट

गेल्या तीन दिवसांपासून खालापूर तालुक्यात वादळी पावसाचा जोर वाढल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेले पीक जमीनदोस्त झाल्याचे पाहून शेतकरी कोलमडून गेला आहे. दररोज ढगफुटीसदृश पाऊस कोसळत असल्याने पिकांचा चिखल झाला आहे. कृषी विभाग, महसूल खात्याच्या वतीने नुकसानीचे पंचनामे होत नसल्याने शेतकरी संताप व्यक्त करत आहेत.

तीन दिवस सतत पडणाऱ्या पावसामुळे भात शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. याबाबत शेतकऱ्यांनी नुकसानग्रस्त शेतीचे तत्काळ पंचनामे करावेत. नुकसानीची तत्काळ भरपाई द्यावी अशी मागणी केली आहे. हातातोंडाशी आलेला घास पावसामुळे हिरावला जात असल्यामुळे शेतकरी हतबल झाले आहेत. शेतातील भात लोंबी डौलदार दिसत असतानाच गेले तीन दिवस सतत पडणाऱ्या पावसामुळे भात पीक जमीनदोस्त झाले आहे. शेतात पावसाचे पाणी साचले असल्याने पडलेले भात कुजणार आहे. असाच पाऊस पडत राहिला तर बळीराजाला मोठ्या संकटाचा सामना करावा लागणार आहे.