कोकणात कोसळधार ! जगबुडी, नारंगी, वशिष्ठी, अंबा नद्यांना पूर; रत्नागिरी, रायगड जिल्हय़ांना रेड अ‍ॅलर्ट

पावसाने विकेण्डला आणखीनच रौद्ररूप धारण केले असून कोकणावर अक्षरशः आभाळ कोसळले आहे. खेडमध्ये जगबुडी, नारंगी नदी, चिपळूणची वशिष्टी, मंडणगडमधील भारज नदी आणि नागोठण्याच्या अंबा नदीला पूर आल्याने रस्ते, शेती पाण्याखाली गेली आहे, तर अनेक घरे-दुकानांमध्ये पाणी शिरले असून काही घरे पाण्याखाली गेल्याने नागरिकांचे प्रचंड हाल झाले आहेत. ही स्थिती पुढील एक ते दोन दिवस कायम राहणार असल्याने रत्नागिरी, रायगडला धोक्याचा इशारा देणारा ‘रेड अलर्ट’ देण्यात आला आहे. मुसळधार पावसाचा कोकण रेल्वेलाही फटका बसला असून खेड ते दिवाणखवटी दरम्यान दरड कोसळल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. मुंबईतही संततधार सुरू असून रस्ते वाहतूक रखडली असून रेल्वे वाहतुकीलाही फटका बसला आहे.

पावसाचा जोर प्रचंड असल्याने कोकण विभागाला मोठा फटका बसत आहे. खेडमध्ये गेल्या 24 तासांपासून ढगफुटीसदृश पाऊस पडत आहे. जगबुडी, नारंगी नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने शहरात पूरस्थिती निर्माण झाली आहे. संगमेश्वरमध्येही गडनदीला पूर आला असून नदीचे पाणी बाजारपेठेत घुसले आहे. वाहतूक बंद झाल्याने तालुक्यातील अनेक गावांचा संपर्प तुटला असून धोका असलेल्या वाडय़ांमधील वाडी-वस्त्यांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले आहे.

रत्नागिरी जिह्यातील शाळा, महाविद्यालयांना आज सुट्टी

जिह्यातील सर्व शाळा व महाविद्यालये (अंगणवाडी, पूर्व प्राथमिक व प्राथमिक, माध्यमिक, महाविद्यालय) विद्यार्थ्यांना उद्या सोमवार सुट्टी जाहीर करण्यात आल्याचा आदेश जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी दिला. जिह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. दरम्यान, रायगड जिल्ह्यातील महाड, पोलादपूर, माणगावमध्ये शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

परीक्षा पुढे ढकलल्या

रत्नागिरी जिह्याला अतिवृष्टीमुळे जाहीर झालेल्या सुट्टीच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थीहित लक्षात घेता व संभाव्य गैरसोय टाळण्यासाठी मुंबई विद्यापीठाच्या उद्या (सोमवार) दिनांक 15 जुलै 2024 रोजी सकाळी आणि दुपारच्या सत्रात होणाऱया रत्नागिरी जिह्यातील सर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. या सर्व परीक्षांच्या सुधारित तारखा लवकरच जाहीर केल्या जाणार असल्याचे परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या संचालिका डॉ. पूजा रौदळे यांनी सांगितले.

राज्यभरात पाऊस

कोकणासह कोल्हापूर, सातारा, पुणे, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदियातही धुवाधार पाऊस होत असून ही स्थिती पुढील काही दिवस अशीच राहणार असल्याने संबंधित विभागांना सतर्कतेचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे, तर ठाणे, पालघर, सांगली, सोलापूरला खबरदारीचा यलो अलर्ट हवामान खात्याकडून देण्यात आला आहे.

कोकण रेल्वे ठप्प

अतिवृष्टीचा फटका कोकण रेल्वेला बसला आहे. आज सायंकाळी खेड ते दिवाणखवटी रेल्वे मार्गादरम्यान दरड कोसळल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. रेल्वे गाडय़ा थांबविण्यात आल्या आहेत. दरड हटविण्यासाठी साधारण अडीच तासांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. दरड हटविण्याचे काम सुरू आहे. कोकण रेल्वे सेवा ठप्प झाल्याने प्रवाशांचा खोळंबा झाला आहे.
श्री गंगानगर एक्सप्रेस कामथे स्थानकात, तेजस आणि जनशताब्दी एक्सप्रेस रत्नागिरीत, सावंतवाडी दिवा दिवाणखवटी स्थानकात थांबून ठेवण्यात आली आहे. मुंबईकडे जाणारी मांडवी एक्सप्रेस खेड स्थानकात थांबवली आहे.

कुर्ल्यात पाच घरांवर भिंत कोसळून तीन महिला जखमी

अंधेरी-कुर्ला रोड जरी मरी राधा नगर चाळीतील चार ते पाच घरांवर भिंत आणि पत्रा शेड कोसळून झालेल्या दुर्घटनेत तीन महिला जखमी झाल्याची घटना आज घडली. या दुर्घटनेतील जखमींना उपचारासाठी साकीनाका येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती पालिकेच्या आपत्कालीन विभागाकडून देण्यात आली. अंधेरी-कुर्ला मार्गावरील राधा नगर चाळ येथे दुपारी 2 वाजताच्या सुमारास जोरदार पाऊस सुरू असताना चार ते पाच घरांवर भिंतीचा भाग व पत्रा शेड कोसळला. यामध्ये एक मजली बांधकाम असलेल्या या चाळीचा भिंतीचा तसेच छताचा भाग कोसळला. या दुर्घटनेत आफरीन शेख (25), रसिका नाडर (35) आणि एक्स्टर नाडर (67) या महिला दुर्घटनेत जखमी झाल्या आहेत.