मुंबई, ठाण्यात आज उद्या मुसळधार पाऊस; वेगवान वारे वाहण्याचीही शक्यता

मुंबई शहर आणि उपनगरांसह ठाणे जिल्ह्यात दोन दिवस मुसळधार पाऊस कोसळेल, तसेच ताशी 40 ते 45 किमी वेगाने वारे वाहतील, असा अंदाज कुलाबा वेधशाळेने वर्तवला आहे. त्यानुसार पुढच्या काही तासांतच मुसळधार पावसाला सुरुवात होऊ शकते, अशी शक्यताही हवामान खात्याने वर्तवली आहे.

मुंबईसह ठाणे आणि पालघर जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे. याशिवाय पुणे, कोल्हापूर, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा आणि यवतमाळ जिल्ह्याला पाऊस झोडपण्याची शक्यता आहे. विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भाग वगळता बाकी भागात धुवाँधार पाऊस कोसळण्याचा अंदाज आहे.

जुलै महिना उजाडला तरी मुंबईत अद्याप म्हणावी तशी वरुणराजाची कृपा झाली नाही. त्यामुळे मुंबईकर उकाड्याने हैराण झाले आहेत. मात्र हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार काही तासात ही स्थिती बदलू शकते.

गुरुवारी कुलाबामध्ये 0.8 मिमी आणि सांताक्रुझमध्ये 2.1 मिमी पावसाची नोंद झाली. आज मुसळधार पावसाची शक्यता असल्याने मुंबईकरांची उकाड्यापासून सुटका होऊ शकते.