पालघर, रायगड, ठाण्यात पावसाने उडवली दाणादाण; कल्याण-कसारा मार्ग सहा तास ठप्प

मुसळधार पावसाने आज पालघर, रायगड व ठाणे जिह्यांची दाणादाण उडवली. नदी, नाले दुथडी भरून वाहत असून काही भागांत पूरस्थिती आहे. वासिंदजवळ ओव्हरहेड वायरचा पोल खचल्याने रेल्वे ठप्प झाली. खर्डीमध्ये दोन महिन्यांपूर्वी बांधलेला पूलच वाहून गेला. कळंबोलीत पाणीच पाणी झाले होते. शहापुरातील भारंगी नदीलाही पूर आला. दरम्यान, कल्याण-कसारा रेल्वे मार्ग सहा तास बंद पडल्याने प्रवाशांचे हाल झाले.

रायगडावर ‘ढगफुटी’; पर्यटक सुखरूप

किल्ले रायगडवर ढगफुटी व्हावी असा पाऊस कोसळला. रायगडाच्या माथ्यावरून धबधबे प्रचंड वेगाने कोसळू लागले. शिवभक्त आणि पर्यटक ज्या मार्गावरून गडावर चढ-उतार करतात त्या मार्गावरही वेगाने कंबरभर पाण्याचे प्रवाह वाहत होते. यात काही पर्यटक अडकून पडले होते. त्यांना इतर पर्यटकांनी आधार देऊन बाहेर काढले.