विजांचा कडकडाट आणि ढगांचा गडगडाट करीत मंगळवारी पहाटे तासभर धुवांधार पाऊस बरसला. पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास कोसळलेल्या पावसाने मुंब्रा, दिव्यात अनेक ठिकाणी पाणीच पाणी झाले. ठाणे शहरातही 10 ते 11 ठिकाणी पाणी तुंबले होते. यामुळे वृत्तपत्र वितरण करणारे आणि दूध वितरकांची चांगलीच त्रेधातिरपीट उडाली. दरम्यान पहाटे 3.30 ते 4.30 या कालावधीत तब्बल 85 मिलिमीटर पाऊस पडला. यावर्षी 3110.28 मिलिमीटर तर गतवर्षी याच कालावधीत 3207.58 मिलिमीटर पावसाची नोंद झाल्याची माहिती ठाणे पालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडून देण्यात आली. गणेशोत्सवात ऊन-पावसाचा खेळ खेळल्यानंतर गेले काही दिवस उसंत घेतलेल्या पावसाने मंगळवारी पहाटे धुवांधार पुनरागमन केले. हवामान विभागाकडून कोणतीही सूचना नसताना मंगळवारी पहाटे साडेतीन वाजता विजांच्या कडाकडाटासह पाऊस कोसळला. साधारण साडेचार वाजेपर्यंत कोसळलेल्या पावसाने दोन-तीन झाडांची व फांद्याची पडझड झाली. इतका धुवांधार पाऊस कोसळूनही सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे पालिकेच्या आपत्कालीन पथकाने सांगितले तर हवामान विभागाने पुढील दोन दिवस ऑरेंज अलर्ट दिला आहे.
20 गाड्यांवर संरक्षक भिंत कोसळली
ठाणे – शिवाईनगर, पोखरण रोड नंबर 1, या ठिकाणी शिवसाई अपार्टमेंट या इमारतीच्या जवळील 10 फूट उंच, 25 फूट लांब संरक्षक भिंत पार्क केलेल्या वाहनांवर कोसळली. सुमारे 20 दुचाकी वाहनांचे नुकसान झाले. आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी व स्थानिक रहिवासी यांच्या मदतीने दुचाकी बाहेर काढण्यात आल्या. तसेच राडारोडा हटवून गृहसंकुलाकडे जाणारा रस्ता मोकळा करण्यात आला.
पालघरमध्ये उद्या रेड अलर्ट
डहाणू – हवामान विभागाने पालघर जिल्ह्याला उद्या 26 सप्टेंबर रोजी रेड अलर्ट जारी केला आहे. मुंबई प्रादेशिक हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील दोन दिवस जिल्ह्यात विजांचा कडकडाट, वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे प्रशासनदेखील सतर्क झाले आहे. पालघर जिल्ह्यात 25 ते 29 सप्टेंबर रोजी आकाश पूर्णपणे ढगाळ राहील तसेच तापमानात घट होऊन आर्द्रतादेखील वाढणार आहे. कमाल तापमान 30 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 25 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आपत्ती विभागाने व्यक्त केला आहे.
माणगावमध्ये ढगफुटीसदृश पाऊस
रायगड जिल्ह्यात मंगळवारी ठिकठिकाणी जोरदार पाऊस झाला. माणगाव तालुक्यातील निजामपूर परिसरातील जोर गावात तर ढगफुटी सदृश पाऊस पडल्याची परिस्थिती पहावयास मिळाली. जोर गाव हे अतिदुर्गम खोरे आहे. गावाकडे जाताना रस्त्यावर पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. डोंगरावरून येणाऱ्या ओहोळच्या मोरीचे कठडे तुटले. या रस्त्यावरून पाण्यात चारचाकी गाडी पाण्यात अडकल्याची घटना घडली. गाडीला नागरिकांनी एका रस्सीच्या सहाय्याने बांधून ठेवल्याने वाहन वाहून गेले नाही. त्याचप्रमाणे खालापूर, उरण तालुक्यात जोरदार पावसाच्या सरी बरसल्या. तर जिल्ह्यातील इतर तालुक्यात उघडीप सुरू होती.