
गेल्या तीन दिवसांपासून रायगड जिह्यात धुवाधार पाऊस सुरू असून नदी, नाले ओसंडून वाहत आहेत. अंबा नदीला तर पूर आल्याने नागोठण्याला पाण्याचा वेढा पडला आहे. कर्जत-खोपोली रेल्वेमार्ग पाण्याखाली गेल्याने वाहतुकीला काही काळ अडथळा निर्माण झाला तर वाकण-पाली-खोपोली राज्यमार्गावरील वाहतूक तब्बल सहा तास ठप्प होती. मुरुड, पेण, तळा तसेच पोलादपूर तालुक्यातील 336 दरडग्रस्तांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर केले असून आणखी दोन दिवस अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असले तरी बळीराजा सुखावला असून रायगड जिह्यातील 28 पैकी 19 धरणे तुडुंब भरली आहेत.
बाजारपेठेत पाणीच पाणी
पहाटेपासूनच अंबा नदीने धोक्याची पातळी ओलांडली. त्यातच पावसाचा माराही सुरूच राहिल्याने पुराचे पाणी नागोठण्यातील सखल भागात शिरले. त्यामुळे तिन्ही रस्ते बंद झाले. एसटी स्थानकातदेखील पाणी घुसल्याने वाहतूक महामार्गावरून वळवण्यात आली. गावातील छत्रपती शिवाजी महाराज चौक, बाजारपेठ, कोळीवाडा, मोहल्ला मटण मार्पेट, शासकीय विश्रामगृह या भागात पूरस्थिती निर्माण झाली. अनेक दुकानांमध्ये पाणी शिरल्याने व्यापाऱयांचे मोठे नुकसान झाले.
महाड, पोलादपूरमध्येही तुफान
महाड, पोलादपूर तालुक्यातही पावसाचे तुफान आले. सावित्री, काळ व गांधारी नदी दुथडी भरून वाहत असून अनेक घरांमध्ये पाणी शिरले. महाड-विन्हेरे-तुळशीखिंडमार्गे खेड येथे डोंगरावरून माती रस्त्यावर आली. त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण झाला. महाडमधील व्यापाऱयांनाही या पावसाचा फटका बसला असून आपत्कालीन स्थिती ओढवल्यास एनडीआरएफचे पथक सज्ज ठेवण्यात आले आहे.