रविवारी पाऊस ‘ऑनडय़ुटी’! घरीच थांबा; हवामान खात्याचा इशारा, मुंबईत तुफानी वाऱ्यासह मुसळधार

मुंबई, नवी मुंबई, ठाणे, रायगडसह राज्याच्या विविध जिह्यांमध्ये आज पावसाने दमदार हजेरी लावली. तुफानी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला. पावसामुळे रस्ते आणि रेल्वे वाहतुकीला फटका बसला. नवी मुंबईत नाले तुडुंब भरून पाणी रस्त्यावर आले तर ठाणे, पालघरमध्ये नद्यांना पूर आला. अनेक ठिकाणी झाडे कोसळल्याच्या घटना घडल्या. अकोल्यात पावसाचा आनंद घेण्यासाठी धबधब्यावर गेलेल्या दोन तरुणांचा बुडून मृत्यू झाला. उद्या विपेंडला रविवारीही पाऊस ऑनडय़ुटी असून तो अतिमुसळधार बरसणार असल्याने नागरिकांनी घरीच थांबावे, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे.

मुंबई आणि उपनगरात आज पहाटेपासूनच जोरदार पाऊस झाला. पश्चिम उपनगरात तुफानी वाऱ्यांसह मुसळधार पाऊस झाल्याने सखल भागांमध्ये पाणी साचले. त्यामुळे काही मार्गांवरील वाहतूक बंद पडली तर काही ठिकाणी वाहनांचा वेग मंदावला. महामार्गावरही अनेक ठिकाणी पाणी साचले होते. अंधेरी सब-वेमध्ये चार फूट पाणी साचले होते. अंधेरीसह सांताक्रुझ, विलेपार्ले, जोगेश्वरी, गोरेगाव, मालाड, कांदिवलीतील सखल भागांमध्येही पाणी साचले होते. झोपडपट्टय़ांमध्येही पाणी शिरले होते. रेल्वे रुळांवर पाणी साचल्याने लोकलगाडय़ा अर्धा ते पाऊण तास विलंबाने धावत होत्या. त्यामुळे चाकरमान्यांचे हाल झाले. पावसामुळे रस्त्यांवर पाणीच पाणी झाल्याने वाहनांना त्यातून मार्ग काढत कासवगतीने प्रवास करावा लागला.

ठाणे जिह्यात कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर परिसराला आज सकाळी पावसाने झोडपून काढले. शुक्रवारी रात्रीपासून कल्याण-डोंबिवलीमध्ये पाऊस थांबून थांबून कोसळला. आज सकाळपासूनही पावसाची संततधार सुरूच आहे. पालघर जिह्यात जोरदार पाऊस असल्याने नदी-नाले ओसंडून वाहत आहेत. तेथील सूर्या नदीला पूर आला आहे.

अकोल्यात दोघे बुडाले

अकोला जिह्यात मुसळधार पावसामुळे दाणादाण उडाली. जिह्यातील धबधबे ओसंडून वाहत आहेत. त्यामुळे पावसाळी पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी धबधब्यांवर तरुणाईला पूर आला आहे. मात्र या आनंदाला आज गालबोट लागले. अकोल्याच्या पातूर तालुक्यातील धोधाणी येथील धबधब्यात बुडून दोन तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली.

कोकणात मुसळधार

कोकणातही मुसळधार वर्षाव सुरू आहे. रायगड जिह्यातील अलिबागमध्ये जिल्हा रुग्णालयात पाणीच पाणी झाले होते. तेथील सर्जरी विभागात पाणी शिरल्याने त्याच परिस्थितीत रुग्णांवर उपचार करणे डॉक्टरांना भाग पडले. दरड कोसळण्याची भीती असल्याने रायगडमधील महाड-भोर वरंधा घाट 31 ऑगस्टपर्यंत पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेशच जिल्हा प्रशासनाने लागू केले आहेत. वरंधा घाटातील वाघजाई मंदिराशेजारी असणाऱ्या वळणातील रस्ता खचल्याने वाहतुकीसह अडथळा येत होता.