मुंबईत आजपासून पाच दिवस मुसळधार; मराठवाडा, विदर्भालाही झोडपणार

गेल्या काही दिवसांपासून मुंबईचा पारा चढला असून उन्हाचे चटके आणि उकाडय़ामुळे मुंबईकर प्रचंड हैराण आहेत. मात्र, उद्यापासून या उकाडय़ापासून दिलासा मिळणार आहे. मुंबईत 24 ते 29 सप्टेंबर असे पाच दिवस मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. मुंबई उपनगर आणि ठाण्यातही जोरदार पाऊस पडेल. तसेच मराठवाडा, विदर्भात चार दिवस मुसळधार पाऊस पडेल असा अंदाजही व्यक्त करण्यात आला आहे. दरम्यान, आज मराठवाडा, विदर्भ आणि कोकणात काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडला, तर मुंबईत सायंकाळच्या सुमारास हलक्या सरी कोसळल्या.

राज्यातील काही भागात 24 सप्टेंबरपासून पुढचे चार दिवस मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.  मुंबई-ठाण्यासह नाशिक, नगर, धुळे, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, बुलढाणा, अकोला, वाशिम, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया जिह्यांत जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता आहे. तर उर्वरित महाराष्ट्रात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

सर्दी, खोकल्याचे रुग्ण वाढणार

कडक ऊन, प्रचंड उकाडा मधेच मुसळधार पाऊस अशा वातावरणामुळे सर्दी, खोकल्याच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. आता पुढचे पाच दिवस पावसाची शक्यता असल्यामुळे ओपीडी, दवाखाने रुग्णांनी भरून जाण्याची शक्यता डॉक्टरांनी व्यक्त केली आहे.

–  24 सप्टेंबरपर्यंत विदर्भात जोरदार आणि नंतर मराठवाडय़ात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल. तर मुंबईसह कोकण, खान्देश आणि नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर जिह्यात किरकोळ, हलका पाऊस पडेल.

–  26 आणि 27 सप्टेंबरला खान्देश, नाशिक, छत्रपती संभाजीनगरमध्ये जोरदार सरी कोसळतील.

28 आणि 29 सप्टेंबरला मुंबईसह ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी जिह्यांत जोरदार पावसाची शक्यता असल्याचे हवामान विभागाचे माजी वैज्ञानिक माणिकराव खुळे यांनी सांगितले.

मुंबईत 24 सप्टेंबरपासून पुढचे पाच दिवस पावसाची शक्यता आहे. 27, 28 आणि 29 सप्टेंबर रोजी पाऊस आणखी वाढेल.  सध्या विदर्भ आणि मराठवाडय़ात पाऊस पडत आहे.

डॉ. अनुपम कश्यपी

(वैज्ञानिक, हवामान विभाग)