परतीच्या पावसाने आज मुंबईसह ठाणे आणि पालघर जिह्याला अक्षरश: झोडपून काढले. मंगळवारी रात्रभर कोसळल्यानंतर बुधवारी दुपारपासून पुन्हा सुरू झालेल्या मुसळधार पावसाने चाकरमान्यांची पुरती दैना केली. शीव, कुर्ल्यादरम्यान रेल्वे ट्रक पाण्याखाली गेल्याने लोकलसेवा ठप्प झाली. पश्चिम रेल्वेवरही लोकलचा खोळंबा झाला. त्यामुळे विविध रेल्वे स्थानकांवर हजारो चाकरमानी अडकून पडले. तासन्तास प्रवाशी लोकल आणि वाहतूक कोंडीत फसले.
मुंबई उपनगर ते दक्षिण मुंबई रस्ते ब्लॉक
मुसळधार पावसामुळे कुर्ला, चेंबूर, मुलुंड, भांडुप, कांजूरमार्ग विक्रोळी, ब्रीच कँडी येथे रस्ते पाण्याखाली गेले. रस्तोरस्ती प्रचंड वाहतूककोंडी झाली. तर गुडघाभर पाण्यातून वाट काढताना चाकरमान्यांची तारांबळ उडाली.
मुंबईला आज रेड अलर्ट
हवामान विभागाने उद्या मुंबई-पालघरसाठी ‘रेड’ तर ठाणे, रायगड आणि पुण्यासाठी ‘ऑरेंज अलर्ट’ जारी केला आहे. नाशिक. धुळे आणि उत्तर महाराष्ट्रालाही अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.
मुंबईकडे येणारी दोन विमाने अन्यत्र वळवण्यात आली. तर सातहून अधिक विमाने लँडिंगसाठी मुंबईच्या आकाशात घिरटय़ा घालत असल्याचे चित्र होते.
कल्याण ग्रामीण परिसरात दोघांचा बळी घेतला. कांबा खदान परिसरात वीज कोसळून दोन जण जागीच ठार झाल्याची घटना घडली.
मुंब्रा बायपासजवळ रात्री साडेआठच्या सुमारास खडीमशीन जवळील सैनिक नगर येथे रस्त्यावर दरड कोसळली. त्यामुळे वाहतूक कोंडी झाली.
पश्चिम उपनगर आणि मध्य मुंबईतही तारांबळ
दीड फुटापर्यंत पाणी भरल्यामुळे अंधेरी सब वे वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. दक्षिण मुंबईकडून येणारी वाहतूक गोखले पुलाकडे वळवण्यात आल्यामुळे येथे प्रचंड वाहतूककोंडी झाली. मालाड सब वेदेखील बंद करण्यात आला होता. येथील वाहतूक साईनाथ रोडच्या दिशेने वळवण्यात आली. मध्य मुंबईत सहकार पंचायत येथे दोन फूट पाणी भरले तर हिंदमाता येथे एक ते दोन फूट पाणी भरल्यामुळे येथील वाहतूक अतिशय संथगतीने सुरू होती.
शाळा, महाविद्यालयांना सुट्टी
हवामान विभागाने मुसळधार पावसाचा इशारा दिल्याने गुरुवारी मुंबई, ठाण्यातील शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
आपत्कालीन परिस्थितीतीमध्ये मुंबईकरांना वेळेत सुविधा द्या ! पालिका आयुक्तांकडे शिवसेनेची मागणी
परतीच्या पावसाने मुंबईत धुमाकूळ घातला असून सर्वसामान्य मुंबईकरांचे जनजीवन विस्कळित झाले आहे. अशातच आपत्कालीन परिस्थितीमध्ये पालिकेकडून मुंबईकरांना वेळेवर सुविधा मिळत नसल्याचे समोर आले आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेने पालिका आयुक्तांना पत्र लिहीत आपत्कालीन परिस्थितीत मुंबईकरांना सुविधा पुरवण्याची मागणी केली आहे. शिवसेनेचे मुख्य प्रतोद सुनील प्रभू यांनी पालिका आयुक्त भूषण गगराणी यांना पाठवलेल्या पत्रात म्हटलेय, मुंबई शहरात आणि उपनगरात बुधवारी सायंकाळी दोन ते तीन तासांत अंदाजे 200 ते 250 मिली मीटर पावसाची नोंद झाली. या अतिवृष्टीमुळे सामान्य मुंबईकरांचे जनजीवन विस्कळित झाले अशा तातडीच्या परिस्थितीमध्ये महापालिकेच्या आपत्कालीन विभागातील फोन उचलले जात नसल्याच्या तक्रारी मला स्थानिक नागरिकांकडून प्राप्त झाल्या आहेत. सखल भागात पाणी साचू नये या उद्देशाने मुंबई मधील आवश्यक सखल ठिकाणी पंप बसविण्यात आले आहेत, परंतू अनेक ठिकाणांचे पंप बंद आहे. आणि यामुळे पूर परिस्थिती निर्माण झाली. यामुळे मुंबईकर भयभीत झाले आहेत. आपत्कालीन परिस्थितीतीमध्ये मुंबईकरांना सुविधा मिळत नसून, सुविधा देण्याचा सूचना संबंधित खात्याच्या प्रमुखांना तसेच सर्व विभागाच्या सहाय्यक महापालिका आयुक्तांना देण्यात याव्यात, अशी विनंती या पत्राद्वारे सुनील प्रभू यांनी केली आहे.