तलाव क्षेत्रात दमदार पाऊस; दोन दिवसांत सवा महिन्याचा पाणीसाठा!

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही तलाव क्षेत्रात सध्या पावसाची जोरदार बॅटिंग सुरू असून गेल्या दोन दिवसांत तब्बल 37 दिवसांचे पाणी जमा झाले आहे, तर सद्यस्थितीत तलाव क्षेत्रात एपूण 5,08,108 दशलक्ष लिटर पाणीसाठा जमा झाला असून हे पाणी ऑक्टोबरअखेरपर्यंत पुरणारे आहे. त्यामुळे मुंबईकरांसाठी दिलासादायक स्थिती निर्माण झाली आहे.

मुंबईला महानगरपालिकेकडून अप्पर वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार आणि तुळशी अशा सात तलावांतून दररोज 3850 दशलक्ष लिटर पाणीपुरवठा केला जातो. मुंबईला वर्षभर पाणीसाठा सुरळीत सुरू राहण्यासाठी 1 ऑक्टोबर रोजी 14,47,363 दशलक्ष लिटर पाण्याची आवश्यकता असते. यानुसार वर्षभराच्या पाणीपुरवठय़ाचे नियोजन केले जाते. मात्र गेल्या काही वर्षांपासून मान्सून सक्रिय होण्यास विलंब लागल्याने तलाव तळ गाठत आहे. त्यामुळे 10 ते 20 टक्क्यांपर्यंत पाणीकपात केली जाते. 2022 मध्ये 17 ऑक्टोबरपर्यंत मान्सून बरसत होता. मात्र 2023 मध्ये 29 सप्टेंबर रोजी पाऊस पडणे बंद झाले. यामुळे दरवर्षी वाढीव 5 ते 7 टक्के जादा मिळणारे पाणी 2024 साठी मिळालेच नाही. पण 1 ऑक्टोबरपासून पाण्याचा वापर मात्र सुरू राहिला. यामुळे या वर्षी पाण्याची तूट निर्माण झाली. त्यामुळे मुंबईत 5 जूनपासून 10 टक्के पाणीकपात लागू करण्यात आली आहे. मात्र सद्यस्थितीत तलाव क्षेत्रात होणारा दमदार पाऊस पाहता समाधानकारक स्थिती निर्माण झाली आहे.

उपलब्ध पाणीसाठा (दशलक्ष लिटरमध्ये)

अप्पर वैतरणा   12,899

मोडक सागर     71,205

तानसा   1,02,611

मध्य वैतरणा     61,066

भातसा   2,38,959

विहार    14,955

तुळशी    6,413