कोकणात पाऊस वेडय़ासारखा कोसळला! नद्या कोपल्या, व्हाळ ओव्हरफ्लो;  मुंबईत दिवसभर मुसळधार

कोकणात दोन दिवसांपासून सुरू झालेल्या पावसाने तिसऱ्या दिवशी रौद्ररूप धारण केल्याने संपूर्ण कोकणात आपत्कालीन स्थिती निर्माण झाली आहे. कोकणातील व्हाळ आधीच ओव्हरफ्लो झाले असून सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगडमधील महत्त्वाच्या नद्यांनीदेखील धोक्याची पातळी ओलांडल्यामुळे पाणी शेतात घुसले आहे. सिंधुदुर्गमधील अनेक घरांना पाण्याचा वेढा पडल्याने शेकडो नागरिकांचे स्थलांतर करण्याची वेळ प्रशासनावर आली आहे. मुंबई-गोवा महामार्गासह अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. कणकवली, कुडाळमध्येही लोकवस्ती-बाजारपेठांमध्ये पाणी घुसल्याने शहरांना अक्षरशः बेटाचे स्वरूप आले आहे. या पार्श्वभूमीवर सुरक्षेसाठी ‘एनडीआरएफ’च्या टीमलाही पाचारण करण्यात आले आहे. दरम्यान, मुंबईलाही दिवसभर पावसाने झोडपून काढल्याने रेल्वे, रस्ते वाहतूकही लुडकली.

मुंबईसह संपूर्ण कोकणात जूनमध्ये पाठ फिरवल्यानंतर जुलैमध्ये मात्र ‘24 तास ऑनडय़ुटी’ राहण्यास सुरुवात केली आहे. सिंधुदुर्गमधील बहुतांशी शहर-गावांत एकाच दिवसांत 100 ते 130 मिमीपर्यंत पाऊस झाल्याने लोकांना घराबाहेर पडणेही मुश्कील झाले आहे. पावसाचा जोर अजूनही कायम असल्याने प्रशासनाकडून नागरिकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. विशेष म्हणजे विदर्भातही सध्या जोरदार पाऊस होत असून हवामान खात्याकडून खबरदारीचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. चंद्रपूरमध्येही ढगफुटीसदृश पाऊस झाला असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. मराठवाडय़ातही विजांच्या कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह जोरदार पाऊस बरसत आहे. मुंबईतही सकाळपासून जोरदार पाऊस बरसत असून अनेक भागात पाणी साचल्याने नागरिकांची गैरसोय झाली.

नद्यांनी ओलांडली धोक्याची पातळी

कणकवलीतील गडनदीसह कुडाळमधील भंगसाळ नदी, वेताळबांबार्डे, हातेरी व हुमरमळा पीठढवळ, तिलारी, कर्ली आणि तेरेखोल नद्यांनी पात्राबाहेरून वाहण्यास सुरुवात केली आहे. नदीकाठच्या गावांमध्ये पूरस्थिती निर्माण झाल्याने काही कुटुंबांचे स्थलांतर करण्यात आले. तर पूरस्थितीमुळे अनेक शाळांनाही सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

वैभववाडीत 35 घरांचा संपर्क तुटला

वैभववाडी तालुक्यातील आशिये गावातील खालचीवाडी येथील भातशेतीत गड नदीला आलेल्या पुराचे पाणी घुसले आहे. गावचे ग्रामदैवत गांगोभैरी मंदिराकडे गडनदी फुटल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे खालचीवाडी येथील 30 ते 35 घरांचा संपर्क तुटला असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

मुंबई-गोवा महामार्गावर दरड

मुंबई-गोवा महामार्गावर खेरशेत येथे रात्री दरड कोसळली. महामार्गाचे काम सुरू असलेल्या लेनवर ही दरड कोसळली. सिमेंट काँक्रिटचे काम झालेला रस्ता वाहतुकीसाठी खुला होता.

लोकल विस्कळीत

मुंबईत झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागात पाणी साचल्याने वाहतुकीला फटका बसला. पूर्व, पश्चिम द्रुतगती मार्ग आणि पूर्व उन्नत मार्गावरील वाहतूक धीम्या गतीने सुरू होती. शिवाय सर्व लोकल सकाळच्या सुमारास दहा ते 15 मिनिटांनी उशिराने धावत होत्या. त्यामुळे कामावर जाणाऱ्या नोकरदारांना मोठा फटका बसला.

उरणमध्ये जोरदार बॅटिंग

उरण परिसरात मागील दोन दिवसांपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसाने उरणला झोडपून काढले आहे. उरणमध्ये कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे शहरातील बोरी-शासकीय इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालय, आपला बाजार, गणपती चौक, पालवी हॉस्पिटल, राजपाल नाका परिसरातील रस्ते पाण्याखाली गेल्यामुळे  मोठय़ा प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली.

कुडाळमध्ये 80 घरे पुरात

मुसळधार पावसाने शुक्रवारी पहाटेपासून नदी किनारीलगतच्या भागात पूरस्थिती निर्माण झाली. कुडाळ भंगसाळ (कर्ली), वेताळबांबार्डे हातेरी व हुमरमळा पीठढवळ या प्रमुख तीनही नद्यांना पूर येऊन पाण्याने पात्र सोडत नदी किनारीलगतचा भाग व्यापला. त्यामुळे नदीकाठच्या शेतमळ्यांना अक्षरशŠ नदीचे स्वरूप प्राप्त झाले. शिवाय नदीकाठच्या सुमारे 70 ते 80 घरांना पहाटेलाच पुराच्या पाण्याने वेढा घातला.

कोकण किनारपट्टीला ‘रेड अलर्ट’

हवामान खात्याने कोकण, पश्चिम किनारपट्टीला पुढील 24 तासांसाठी ‘रेड अलर्ट’ जारी केला आहे.

पेणमध्ये ढगफुटीसारखी स्थिती

पेणमध्ये ढगफुटीसारखा पाऊस झाला आहे. त्यामुळे शहरातील रस्त्यांना नद्यांचे स्वरूप आले होते. तसेच बस स्थानक, बाजारपेठांमध्येही पाणी घुसल्याने प्रवाशांसह व्यापाऱयांनाही तडाखा बसला. शहरातील भुंडय़ा पुलावरून पाणी जात असल्याने नगरपालिका प्रशासनाने हा मार्ग तत्काळ बंद केला. खरोशी व दूरशेत येथील रस्ता पाण्याखाली गेल्याने दोन्ही गावची वाहतूक व्यवस्था बंद झाली.