कोल्हापुरात पावसाचा जोर; पंचगंगेवरील राजाराम बंधारा पाण्याखाली

कोल्हापूर जिह्यात गेल्या काही दिवसांपासून कमीअधिक प्रमाणात पावसाचा जोर दिसून येत आहे. शेतीसाठी अधिक जोरदार पावसाची आवश्यकता असताना धरण पाणलोटक्षेत्रात मात्र ठिकठिकाणी धुवाँधार पाऊस होताना दिसून येत आहे. त्यामुळे गेल्या 24 तासांत पंचगंगेची पातळी तब्बल अडीच फुटांनी वाढली असून, यंदा पावसाळ्यात प्रथमच पंचगंगा नदीवरील कसबा बावडा येथील राजाराम बंधाऱयावर पाणी आल्याने वाहतुकीस बंद करण्यात आला आहे.

यंदा मान्सून वेळेवर आल्याने जिह्यातही ठिकठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे. पावसामुळे ठिकठिकाणी भातपेरणीला सुरुवात झाली आहे. शेतीसाठी अजूनही दमदार पावसाची प्रतीक्षा असली, तरी धरण पाणलोटक्षेत्रात दमदार पाऊस बरसताना दिसत आहे. त्यामुळे धरणासह नदीच्या पाणीपातळीत वाढ होऊ लागली आहे.

यंदा राधानगरी धरणात पावसाळ्यापूर्वी 2 टीएमसी पाणीसाठा शिल्लक होता. सध्या पाणलोटक्षेत्रातील दमदार पावसाने राधानगरी धरणातील पाणीसाठय़ात वाढ झाली आहे. त्यामुळे धरणातून वीजनिर्मितीसाठी सध्या 800 क्युसेक विसर्ग सुरू केला आहे. परिणामी, पंचगंगा नदीपातळीत वाढ झाली असून, गेल्या 24 तासांत तब्बल दोन फुटांहून अधिक वाढ झाल्याचे दिसून येत आहे. काल सकाळी आठच्या सुमारास राजाराम बंधाऱयाची पाणीपातळी 14 फूट 3 इंच होती, तर आज सकाळी ती 16 फूट 7 इंचांवर पोहोचली होती. 24 तासांत तब्बल 2 फूट 4 इंचांनी ही पातळी वाढल्याने राजाराम बंधारा पाण्याखाली गेला. तरीसुद्धा त्यावरून धोकादायक पद्धतीने वाहतूक सुरू असल्याने पोलिसांकडून हा बंधारा वाहतुकीस बंद करण्यात आला आहे.