कोकणात आभाळ फाटलं, मुंबईलाही झोडपलं; पावसाच्या तडाख्याने जनजीवन विस्कळीत

पावसाने संपूर्ण महाराष्ट्र व्यापला असून कोकण आणि मुंबईला पावसाचा चांगलाच तडाखा बसला आहे. कोकणात आणि मुंबईत रविवारी सकाळपासून मुसलधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे कोकणात अनेक नद्या धोक्याच्या पातळीवरून वाहत आहेत. तर मुंबईतही पावसाने वाहतुकीला ब्रेक लागला आहे. या मुसळधार पावसाने कोकण आणि मुंबईत जनजीवन विस्कळीत झाले आहे. तसेच अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आल्याने प्रशासन अलर्ट मोडवर आहे.

कोकणात तीन दिवसापासून जोरदार पाऊस कोसळत आहे. त्यामुळए अनेक नद्या धोक्याच्या पातळीवरून वाहत आहेत. खेड तालुक्यामध्ये जगबुडी नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून बाजारपेठेत पाणी शिरले आहे. तसेच अर्जुना, कोदावली आणि काजळी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. अतिमुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. काजळी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने मुंबई-गोवा महामार्गावरील आंजणारी पुल वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे.पुल बंद झाल्याने रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. कोकणात मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे.

काजळी नदीची पाणी पातळी वाढल्याने चांदरेाई पुलावर पाणी आले आहे. राजापूरातील अर्जुना आणि कोदवली नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने पुराचे पाणी राजापूर शहरातील जवाहर चौकात शिरले. जिल्ह्यातील कोदवली आणि मुचकुंदी या नद्या इशारा पातळीवर वाहत आहेत. तसेच तालुक्यातील काजळी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्यामुळे पुलावरून पाणी वाहत आहेत. त्यामुळे आजुबाजुच्या गावांचा संपर्क तुटला आहे. शेतामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने शेतकऱ्यांचे सुद्धा नुकसान झाले आहे. संततधार पाऊस सुरू असल्याने नद्यांची पाणी पातळी वाढून राजापूर शहरात आतापर्यंत तिसऱ्यांदा पुराचे पाणी शिरले आहे.

मुंबईतही पावसाची दमदार बॅटिंग, सतर्कतेचे आवाहन
मुंबईत रविवार सकळापासूनच पावसाने दमदरा बॅटिंगला सुरुवात केली आहे. अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिल्याने प्रशासन आणि पोलीस अलर्ट मोडवर आहेत. मुंबई पोलिसांनी नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे. मुंबईमध्ये सुरू असलेला संततधार पाऊस व पावसाचा जोर पाहता नागरिकांना विनंती आहे की त्यांनी किनारपट्टी भागात जाणे टाळावे आणि गरज असेल तरच घराबाहेर पडावे, असे ट्विट मुंबई पोलिसांनी केले आहे.

मुंबईत उपनगरातही पावसाचा जोर वाढल्याने अनेक भागात पाणी साचले आहे. त्यामुळे रविवारी अनेकांनी घरातच राहणे पंसत केले. कुर्ला पूर्व भागातही पाणी साचल्याने रस्ते वाहतूक संथ गतीने सुरू आहे. यासह मुसळधार पावसाचा परिणाम हवाई वाहतुकीवरही झाला असून मुंबई विमानतळावरील विमानांचे उड्डाण उशिराने होत आहे.परळमध्येही मुसळधार पावसामुळे काही भागात पाणी साचले आहे. त्यामुळे रस्ते वाहतूक विस्कळीत झाली आहे.

रायगड, रत्नागिरी, साताऱ्याला अति मुसळधार ते मुसळधार, तर मुंबई, ठाणे, पालघर, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, जावना, परभणी शहरांना मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. धुळे, जळगाव, नाशिक, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदिया जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पाऊस पडेल अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.