जून महिन्यात पावसाने प्रचंड हिरमोड केला. नुसतेच ढगाळ वातावरण, वारा आणि हलका पाऊस असे वातावरण होते. मात्र जुलैमध्ये पाऊस निराश करणार नाही. या महिन्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस होईल, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. बळीराजासाठी ही आनंदाची बातमी असून दुबार पेरणीचे संकट टळणार आहे.
प्रशांत महासागरातील एल निनो तटस्थ अवस्थेत असून ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यात ला-नीनासाठी पोषक वातावरण असेल. त्यामुळे एकूणच पावसासाठी पोषक वातावरण असून जुलै महिन्यात देशभरात सरासरीच्या 106 टक्के पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. जुलै महिन्यात देशभरात सरासरी 280.4 तर महाराष्ट्रात 362 मि.मी. पाऊस पडतो. यंदा सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाचे महासंचालक डॉ. मृत्युंजय महापात्रा यांनी वर्तवला आहे.
महाराष्ट्रात मुसळधार पाऊस
राज्यात कोकण किनारपट्टी, मध्य महाराष्ट्रात चांगल्या पावसाचा अंदाज असून उत्तर महाराष्ट्रात काहीसा कमी परंतु सरासरी इतका पाऊस पडण्याची शक्यता आहे. दरम्यान, देशभरात राजस्थान आणि पंजाबचा वायव्य भाग वगळता मोसमी पावसाने देशाचा सर्व भाग व्यापल्याचे चित्र आहे.
पुढील 48 तासांत विदर्भातील अकोला, अमरावती, गडचिरोली. गोंदिया आणि नागपूर या ठिकाणी वादळी वाऱयासह जोरदार पडेल.
ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, पुणे, कोल्हापूर या जिह्यांना ‘यलो अलर्ट’ म्हणजेच पुढचे तीन दिवस मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
मराठवाडय़ातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशीव तसेच परभणी जिह्यांत पावसाचा जोर वाढेल. उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, धुळे, नंदुरबारसह जळगाव जिह्यात तुफान पावसाची शक्यता आहे.
जून गेला कोरडा
जून महिन्यात दक्षिण हिंदुस्थानचा अपवाद वगळता देशभरात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला. देशात सरासरी 165.3 मि.मी. पाऊस पडतो. प्रत्यक्षात 10.9 टक्के कमी म्हणजेच 147.2 मि.मी. पाऊस झाला. दक्षिण हिंदुस्थानात सरासरी 161 मि.मी. पाऊस पडतो. तिथे 14.2 टक्के अधिक म्हणजेच 183.9 मि.मी. पाऊस झाला. वायव्य हिंदुस्थानात सरासरी 78.1 मि.मी. पाऊस पडतो. प्रत्यक्षात 32.6 टक्के कमी म्हणजेच 52.6 मि.मी. इतकाच पाऊस झाला. ईशान्य हिंदुस्थानात 328.4 मि.मी. पाऊस पडतो. प्रत्यक्षात 13.3 टक्के कमी, 284.9 मि.मी. इतका पाऊस झाला. तर मध्य हिंदुस्थानात 170.3 मि.मी. सरासरी पाऊस पडतो. प्रत्यक्षात 13.7 टक्के कमी म्हणजेच 147 मि.मी. पाऊस पडला. एकंदर जून महिना कोरडाच गेल्याचे चित्र देशाच्या अनेक भागांत आहे.