मुंबई–ठाण्यात उद्यापासून तीन दिवस मुसळधार

सर्वांना प्रतीक्षा लागून राहिलेला मान्सून कोकणात डेरेदाखल झाल्यानंतर चांगलाच स्थिरावला असून राज्यभरात वेगाने पसरत आहे, तर रविवारपासून मंगळवारपर्यंत मुंबई-ठाणे परिसरात ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस पडणार असल्याने हवामान खात्याकडून खबरदारीसाठी ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे. तर सिंधुदुर्गला काळजी घेण्याचा ‘ऑरेंज अलर्ट’ हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी तीन दिवस आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडावे, असा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे.

मुंबई-ठाण्यात रविवारपासून पावसाला सुरुवात होईल. 10 आणि 11 जून रोजी मुंबई-ठाणे परिसरात मेघ गर्जनेसह पावसाच्या जोरदार सरी कोसळतील. मात्र हा मान्सूनचा पाऊस नसून मान्सून पूर्व पाऊस आहे, असे आयएमडी, मुंबईच्या सुष्मा नायर यांनी सांगितले.

राज्यात अनेक जिल्ह्यांना इशारा
ठाणे, मुंबई, पालघर, रायगड या भागात पावसाची हजेरी लागण्याचा अंदाज आयएमडीने वर्तवला आहे. याशिवाय, जळगाव, धुळे, कोल्हापूर, नांदेड, लातूर, परभणी, हिंगोली या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशीव या जिह्यांत पुढील 48 तासांसाठी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पुणे आणि नगर या भागात काही ठिकाणी रिमझिम पाऊस पाहायला मिळेल, असे हवामान खात्याकडून कळविण्यात आले आहे.