
दोन दिवसांपासून विदर्भात पावसाची धुंवाधार बॅटिंग सुरू असून, जनजीवन विस्कळीत झाले आहे. रविवारी दुसर्या दिवशी भंडारा , गोंदिया, चंद्रपुरात कोसळधार पहायला मिळाली आहे. चंद्रपूरात सहाशे घरांची पडझड झाल्याने दोन जणांचा मृत्यू तर पाच जण जखमी झाले. ब्रह्मपुरी, नागभीड तालुक्यात सर्वाधिक पावसाची नोंद झाली असून, हजारो हेक्टर शेतीचे नुकसान झाले. नागपूरमध्ये हुडकेश्वरनगरात अडकलेल्या 50 विद्यार्थ्यांची सुटका करण्यात आली आहे. नागपूरात परिस्थिती बिकट बनली असून, रस्ते वाहून गेल्याने महापालिकेचे पितळ उघडे पडले.
चंद्रपुरातील पावसाच्या मार्याने पोंभुर्णा तालुक्यातील जाममखुर्द येथील एका घराची भिंत कोसळली आहे. यात पाच जण जखमी झाले आहेत. जखमींवर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहेत. नागभीड तालुक्यातील विलंब या गावचा रहिवासी असलेला दहा वर्षांचा वर्षाचा रोनाल्ड पावणे हा मुलगा विलंब रोडनजीकच्या नाल्यात वाहून गेला आहे. तर बोथली येथील नाल्यात स्वप्निल दोनोडे याचा बुडून मृत्यू झाला आहे. त्याचा मृतदेह स्थानिक शोध बचाव पथकाच्या मदतीने बाहेर काढण्यात यश आले आहे.
प्रशासनाकडून खबरदारीच्या सूचना
दोन दिवसांपासून विदर्भात मुसळधार पाऊस सुरु आहे. हवामान विभागाने आजही ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. या पार्श्वभूमीवर प्रशाननाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. पूरपरिस्थितीचा आढावा घेऊन पंचनामा करण्यात सूचना देण्यात आल्या आहेत. दरम्यान, नागरिकांनी पूर परिस्थितीत काळजी घ्यावी, असे आवाहन देखील जिल्हाधिकारी विनय गौडा जीसी यांनी केले आहे.
नितीन गडकरी घेणार जनता दरबार,अधिकार्यांच्या पोटात गोळा
अनेक वर्षांपासून नागपूर महापालिकेत भाजपची सत्ता आहे. महाराष्ट्राची राजधानी असलेल्या नागपुरात भाजपसह संघाचे नेते वास्तव करतात. मात्र, मुसळधार पावसाने नागपूरकरांची उडालेली दैना, महापालिकेने केलेल्या पावसाळी कामांचे उघडे पडलेले पितळ यामुळे सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री व नागपूरचे खासदार नितीन गडकरी यांनी चार ऑगस्टला थेट महापालिकेतच जनता दरबार आयोजित केला आहे. त्यामुळे अधिकार्यांच्या पोटात गोळा आला आहे. मात्र, आता गडकरी थेट नागपूर महापालिकेच्या मुख्यालयातच जनता दरबार घेणार असल्याने व ते विधानसभा मतदारसंघनिहाय समस्या ऐकून घेणार असल्याने लोकप्रतिनिधी आणि अधिकार्यांनी काय दिवे लावले हे समोर येणार आहे.