गोंदियात पावसाचा कहर सुरूच आहे. ढगफुटीसारख्या पावसामुळे जनजीवन अक्षरशः विस्कळीत झाले आहे. गोंदिया जिल्ह्यात मंगळवारी पहाटेपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. जिल्ह्यात पुरस्थिती निर्माण झाली असून मुसळधार पावसामुळे फुलचूर नाल्याला पूर आला. नाल्यातील पाणी वाढल्याने लगतच असलेली दोन मजली इमारत थेट नाल्यात कोसळली. यात मायलेकाचा मृत्यू झाला.
पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने आईचा तर घराच्या ढिगाऱ्याखाली दबल्याने मुलाचा मृत्यू झाला. दीपिन अग्रवाल (27) आणि किरण अग्रवाल (50) अशी मृतांची नावे आहेत, तर अनिल अग्रवाल (52) हे या दुर्घटनेतून थोडक्यात बचावले. घराच्या ढिगाऱ्याखालून दीपिन अग्रवाल याचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. मुसळधार पावसामुळे वाघ नदीला पूर आला असून ही नदी दुथडी भरून वाहत असल्याचे चित्र आहे. या नदीत एक डिझेल टँकर वाहून गेल्याची घटना आज सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमनारास घडली. या घटनेचा व्हिडियो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आहे.