अफगाण-न्यूझीलंड कसोटी, पहिल्या दिवशी पावसाची बॅटिंग

अफगाणिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यातील एकमेव कसोटी लढत पावसाच्या नॉनस्टॉप बॅटिंगमुळे सुरूच होऊ शकली नाही. गेले आठवडाभर कोसळणाऱ्या पावसामुळे ओल्या मैदानावर पहिल्या दिवसाचा खेळ वाया गेला. पावसामुळे खेळ सुरू होण्याची शक्यता कमी असल्यामुळे नाणेफेकही उडवण्यात आली नाही. कसोटीच्या दुसऱ्या दिवशीही पावसाची पृपादृष्टी राहिली तर उपाहारानंतर कसोटीला सुरुवात होऊ शकते, अन्यथा दुसऱ्या दिवसावरही पावसाचेच पाणी ओतले जाण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

ग्रेटर नोएडामध्ये गेल्या दोन आठवड्यांपासून सतत पाऊस पडत आहे. रविवारी रात्रीही जोरदार पाऊस झाला. त्यामुळे जमीन ओली झाली आणि अजून सुकलेली नाही. ग्राऊंड्समन सुपर सुपरचार्जरच्या मदतीने मैदानाची दुरुस्ती करण्यात व्यस्त आहेत.

अफगाणिस्तानचा सलामीचा फलंदाज इब्राहिम झदरान न्यूझीलंडविरुद्धच्या या एकमेव कसोटीतून बाहेर पडला आहे. नेट प्रॅक्टिसदरम्यान त्याचा डावा पाय मुरगळला. त्यामुळे आघाडीचा फलंदाज  इब्राहिम खेळणार नसल्याचे व्यवस्थापनाने सांगितले होते. त्याला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या वन डे मालिकेतून वगळण्यात आले आहे.