उन्हाचा तडाखा वाढला; मुंबईकर भिरभिरले, ठाण्याच्या तापमानातही मोठी वाढ

राज्याच्या ग्रामीण भागाप्रमाणे मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर परिसरात उन्हाचा तडाखा प्रचंड वाढला आहे. मंगळवारी मुंबई शहर आणि उपनगरांत जणू सूर्य आग ओकत होता. त्यामुळे दुपारच्या कडक उन्हात चालताना मुंबईकर अक्षरशः भिरभिरले. तळपायापासून मस्तकापर्यंत उन्हाचे तीव्र चटके सहन करावे लागले. त्यात अनेकजण चक्कर येऊन खाली कोसळल्याच्याही घटना घडल्या. पुढील 48 तासांत मुंबई-ठाण्यासह राज्यभरात उष्णतेच्या तीव्र लाटा धडकतील, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे.

राज्यात अवकाळी पावसाची हजेरी लागल्यानंतर उष्णतेत प्रचंड वाढ झाली आहे. गेले तीन दिवस विदर्भात तापमानाचा नवनवीन उच्चांक नोंदवला जात आहे. तशीच परिस्थिती राज्याच्या इतर भागांसह मुंबई, ठाण्यातही निर्माण झाली आहे. मुंबईत सलग तिसऱ्या दिवशी कमाल तापमानात मोठी वाढ झाली. शहराच्या अनेक भागांत 36 अंश तापमान नोंद झाली. त्यातच हवेतील आर्द्रतेचे प्रमाणही वाढल्याने मुंबईकरांची दुपारी तीव्र उन्हात चालताना प्रचंड दमछाक झाली.

थंड हवेचे माथेरानही 36 अंशांनी तापले!

z मुंबई-ठाण्याशेजारील थंड हवेचे ठिकाण असलेल्या माथेरानमध्येही तापमानाचा भडका उडाला आहे. एरव्ही उन्हाळय़ात सरासरीच्या पातळीवर राहणारे माथेरानचे तापमान यंदा 36 अंशांवर झेपावले आहे.

z सलग तीन दिवस अकोला, नागपूर परिसरात विक्रमी तापमानाची होरपळ नागरिक सहन करीत आहेत. सोमवारी अकोला शहरात सर्वाधिक 44.2 अंश, तर मंगळवारी 44.1 अंश तापमान नोंद झाले. बुलढाणा, अमरावती, यवतमाळ, नागपूर या जिह्यांतही उष्णतेच्या लाटा धडकल्या आहेत.