महाराष्ट्राची होरपळ! मिंधे नॉट रिचेबल आणि कृषीमंत्री मुंडे गायब; मुंबई – कोकणात उष्म्यासोबत आर्द्रतेने घाम फोडला

सूर्य आग ओकतोय. चांद्यापासून बांद्यापर्यंत महाराष्ट्राची होरपळ होतेय. विदर्भात तर माणूस करपून जाईल इतके तापमान आहे. नागपुरात उष्माघाताने तीन जणांचा बळी घेतला. मुंबई आणि कोकणात तर आर्द्रतेचे प्रमाण अधिक असल्याने लोकांचा घामटा निघाला आहे. दुसरीकडे दुष्काळ, अवकाळी, गारपीट अशा नैसर्गिक संकटात शेतकऱयांची पीके उद्ध्वस्त झाली आहेत. उद्ध्वस्त शेतातून ते मदतीसाठी मुख्यमंत्री आणि कृषिमंत्र्यांना पह्न करत आहेत, पण मुख्यमंत्री मिंधे नॉट रिचेबल आहेत आणि कृषीमंत्री धनंजय मुंडे गायब आहेत.

काँग्रेसच्या वतीने आजपासून दुष्काळी भागांचे दौरे सुरू करण्यात आले. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज बीड जिह्यातील गेवराई तालुक्यातील रुई गावात जाऊन दुष्काळग्रस्त शेतांची पाहणी केली. रुई हे गाव रेशीम उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. तेथील सुमारे बाराशे एकर शेतजमिनीवर रेशीम उत्पादन घेतले जाते, परंतु दुष्काळामुळे यंदा ते उद्ध्वस्त झाले.

रुई गावातील रेशीम उत्पादक शेतकरी मोठय़ा संकटात सापडला आहे. नाना पटोले यांनी आज तेथील उद्ध्वस्त पिकांची पाहणी केली. पटोले यांनी तेथील धरणाचीही पाहणी केली. त्याचवेळी एका शेतकऱयाच्या शेतातूनच त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि कृषिमंत्री धनंजय मुंडे यांना पह्न केला, परंतु दोघांचेही पह्न संपका&त नव्हते. शेतकरी संकटात असताना मंत्री त्यांच्या मदतीसाठी पोहोचत नाही, असा आरोप पटोले यांनी केला.

शेतकऱयांची परिस्थिती अत्यंत गंभीर बनली असून त्यांना शासन दरबारी तातडीच्या मदतीची गरज आहे. ती मदत मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्न करू आणि आगामी पावसाळी अधिवेशनात दुष्काळाचा मुद्दा प्राधान्याने मांडू, असे या दौऱयावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना नाना पटोले यांनी सांगितले.

– काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान यांच्या अध्यक्षतेखालील शिष्टमंडळाने ठाणे जिह्यातील शहापूर, मुरबाड, कसारा येथे दुष्काळी भागांना भेटी दिल्या. भेटीदरम्यान पाण्याबरोबर वीजही उपलब्ध होत नसल्याची तक्रार रहिवाशांनी केली. यावेळी माजी खासदार भालचंद्र मुणगेकर, कुमार केतकर, राजेश तावरे, सरचिटणीस राजेश शर्मा, भरत सिंह, संदीप पांडे, अॅड. आर. पी. पांडे, दयानंद चोरघे, चेतन पवार, कृष्णा पाटील, सोमनाथ मिरकुटे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

– हवामान विभागाने नागपूरमध्ये उभारलेल्या चार स्वयंचलित हवामान पेंद्रांपैकी दोन केंद्रांनी 50 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त तापमान दाखवले. 30 मे रोजी उत्तर अंबाझरी रोडपासून काही अंतरावर असलेल्या रामदास पेठ येथील पीडीकेव्हीच्या 24 हेक्टर खुल्या शेताच्या मध्यभागी असलेल्या नागपूर हवामान पेंद्रामध्ये तब्बल 56 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

हवामान खाते गडबडले

नागपूर शहरातील स्वयंचलित हवामान केंद्रातील सेन्सरमध्ये बिघाड झाला असून त्याच्या दुरुस्तीचे काम सुरू आहे. उच्चतम तापमानात इलेक्ट्रॉनिक सेन्सर काम करत नाहीत. त्यामुळे चुकीच्या नोंदी होऊ शकतात. 30 मे रोजीची 56 डिग्रीची नोंद चुकीची आहे. ती आम्ही अधिकृतपणे जाहीर केलेली नाही. त्या दिवशी कमाल तापमान 44 डिग्री होते, असे नागपूर आयएमडीने स्पष्ट केले.

आतापर्यंत 22 बळी

उष्माघाताने नागपूर शहरात आणखी तिघांचा मृत्यू झाला असून एकूण बळींची संख्या 22 वर गेली. कस्तुरचंद डागा बाल सदनसमोर गुरुवारी सकाळी 55 वर्षीय इसमाचा मृतदेह आढळला. लक्ष्मीनगर चौकात बुधवारी 35 वर्षीय युवक बेशुद्धावस्थेत आढळला. तिसऱया घटनेत कळमन्यातील मेहता काटासमोर 50 वर्षीय कालू नावाचा इसम बेशुद्धावस्थेत आढळला. तिघांचाही उष्माघाताने मृत्यू झाल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.

शेतकऱयांच्या डोळ्यात अश्रू

छत्रपती संभाजीनगर, जालना आणि बीड जिह्यातही काँग्रेसच्या वतीने दुष्काळ पाहणी दौरा झाला. देवराई बुद्रुक, पैठण, आडूळ सर्कल येथे नुकसानीची पाहणी करण्यात आली. यावेळी मोसंबी उत्पादक शेतकरी बंडू पुंजाराम आगळे यांनी दुष्काळामुळे उद्ध्वस्त झालेली आपली बाग दाखवली. पंचवीस वर्षे फळे देणारी बाग हाताने उपटून काढण्याची वेळ आली, असे सांगताना आगळे यांना अश्रू अनावर झाले होते.

राज्यभरात सूर्य आग ओकत असताना मुंबई-कोकणाच्या बहुतांशी भागात तापमान 32 ते 35 अंशांपर्यंत असले तरी वातावरणात उकाडा मात्र 40 ते 45 अंश तापमान असल्याप्रमाणे जाणवत होता. वातावरणातील आर्द्रता 75 टक्क्यांवर पोहोचल्याने ही स्थिती निर्माण झाल्याचे मुंबई हवामान खात्याकडून सांगण्यात आले. यामुळे नागरिकांचा मात्र चांगलाच घामटा निघाला.