Heat Strok : उष्णतेचा कहर! निवडणुकीसाठी तैनात 5 होमगार्डचा मृत्यू; 16 जण रुग्णालयात दाखल

संपूर्ण देशात उष्णतेचा प्रकोप झालेला पाहायला मिळत आहे. उत्तर हिंदुस्थानामध्ये उष्णतेचे सर्व रेकॉर्ड मोडीत निघाले आहेत. काही भागांमध्ये तर 51 अंश सेल्सिअसवर तापमानाचा पारा पोहोचला आहे. या भयंकर उष्णतेमुळे नागरिकांना आपला जीव गमवावा लागत असल्याच्या अनेक घटना देशभरात घडत आहेत. अशातच उत्तर प्रदेशमध्ये एक भयंकर घटना घडली असून निवडणुकीसाठी तैनात असलेल्या 5 होमगार्डचा उष्माघाताने मृत्यू झाला आहे.

Lok Sabha Election 2024 च्या अंतिम टप्प्यातील मतदान प्रक्रिया 1 जून रोजी पार पडणार आहे. उत्तर प्रदेशातील मिर्झापूरमध्ये त्यासाठी जय्यत तयारी सुरू करण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर निवडणुकीसाठी काही होमगार्ड तैनात करण्यात आले होते. पण उष्णतेच्या प्रकोपापुढे त्यांचा टिकाव लागला नाही. आणि त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. 16 होमगार्डची तब्बेत अचानक बिघडल्यामुळे त्यांना जवळील ट्रॉमा सेंटरमध्ये उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे. मात्र 5 जणांचा उष्णतेच्या लाटेत दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार मिर्झापूरमध्ये आज (31 मे 2024) 49 अंश सेल्सियस तापमानाची नोंद करण्यात आली आहे. तर उद्या (01 जून 2024) तापमान 49 अंश सेल्सियस पेक्षा अधिक असण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.