सूर्य आग ओकतोय! उष्माघाताने घेतला यूपीत 160, बिहारमध्ये 20, ओडिशात 10, तर झारखंडमध्ये 5 जणांचा बळी

गेल्या काही दिवसांपासून सूर्य आग ओकत असून देशातील अनेक भागामध्ये तापमानाचा पारा पन्नाशी पार गेला आहे. वाढत्या तापमानामुळे उष्माघाताचा त्रासही होत आहे. उष्णतेच्या तीव्र लाटेमुळे लोकांचा जीवही जात असून बिहार, झारखंड, ओडिशामध्ये गेल्या 24 तासांमध्ये 35 जणांचा उष्माघाताने मृत्यू झाला आहे.

बिहारमधील अनेक जिल्ह्यांतील पारा 44 पार पोहोचला आहे. त्यामुळे लोकांना उष्माघाताचा त्रास होत असून रुग्णसंख्या वाढत आहे. बिहारमधील औरंगाबाद जिल्ह्यात 12 जणांचा उष्णाघाताने मृत्यू झाला, तर 20हून अधिक जण रुग्णालयात उपचार घेत आहेत. यासह झारखंडमधील पलामू जिल्ह्यात गेल्या 24 तासात 5, ओडिशात 10 जणांचा उष्णाघाताने बळी घेतला आहे.

शाळा बंद

बिहारमध्ये तापमानाचा पारा वाढल्याने सरकारने शाळा बंद ठेवण्याचा निर्णय नितीशकुमार सरकारने घेतला आहे. तसेच नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये. तसेच सकाळी 11 ते 4 या वेळेत घरातच थांबावे असे आवाहन आपत्ती व्यवस्थापन विभागाने केले आहे.

भावंडं दगावली

दरम्यान, मध्य प्रदेशमध्येही तापमानाचा पार वाढला आहे. ग्वाल्हेरमध्ये उष्णाघाताने 12 आणि 14 वर्ष वयोगटातील दोन मुलांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. हे दोघे भाऊ आई आणि आजीसोबत औषधं घेण्यासाठी गेली होती. याचवेळी त्यांना उष्माघाताचा त्रास झाला. त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्यांचा मृत्यू झाला.

उत्तर प्रदेशमध्ये 160हून अधिक मृत्यू

उत्तर प्रदेशमध्येही उष्माघाताने कहर केला आहे. येथे 160 हून अधिक लोकांचा उष्माघाताने मृत्यू झाला आहे. यापैकी सर्वाधिक 72 मृत्यू वाराणसी आणि आसपासच्या भागात झाले आहेत. बुंदेलखंड आणि कानपूरमध्ये 47 मृत्यू , महोबामध्ये 14, तर हमीरपूरमध्ये 13, बांदामध्ये 5 जणांचा मृत्यू झाला. यासह चित्रकूटमध्ये दोघांचा, तर फर्रुखाबाद, जालौन आणि हरदोईमध्ये तिघांचा मृत्यू झाला.

काय काळजी घ्याल?

– दुपारच्या सुमारास घराबाहेर पडण्याचे टाळा
– जास्तीत जास्त पाणी प्या आणि शरीर थंड ठेवा
– हलक्या रंगाचे घाम शोषणारे सुती वस्त्र घाला
– डोळ्यावर काळा चष्मा, टोपी घालून किंवा छत्री घेऊनच घराबाहेर पडा
– प्रवासात पाणी, फळं सोबत राहुद्या
– घरी असाल तर लिंबू सरबत, ताक, लस्सी, कैरीचे पन्हे याचा वापर करा
– उष्माघाताची लक्षणे (उदा. अशक्तपणा, चक्कर, डोकेदुखी, घाम येणे, बेशुद्ध पडणे) दिसताच तात्काळ डॉक्टरांशी संपर्क साधा