पैशांअभावी पाच महिन्यांपासून हृदयशस्त्रक्रिया रखडली; शिवसेनेमुळे दहा वर्षीय मुलीला मिळाले जीवदान

आर्थिक परिस्थिती बेताची असल्यामुळे पर्णवी तळेकर या दहा वर्षीय मुलीची हृदयशस्त्रक्रिया गेल्या पाच महिन्यांपासून रखडली होती, मात्र शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या प्रयत्नांमुळे नुकतीच या मुलीवर शीव येथील लोकमान्य टिळक रुग्णालयात निःशुल्क शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडली. याबद्दल पर्णवी आणि तिचे वडील गिरीश तळेकर यांनी शिवसेनेचे आभार मानले आहेत.

संपूर्ण राज्यातील त्रासलेल्या जनतेचे प्रश्न सोडवण्याकरिता शिवसेना सदैव कटिबद्ध आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने उपनेते नितीन नांदगावकर यांचा जनता दरबार दर बुधवारी सकाळी 10 ते 6 या वेळेत शिवसेना भवन येथे भरवण्यात येतो, ज्यात राज्याच्या कानाकोपऱयातून आलेली त्रस्त जनता आपली पैफियत मांडते. हृदयरोगाने ग्रस्त असलेल्या पर्णवी तळेकर या चिमुकलीवर शीव येथील लोकमान्य टिळक रुग्णालयात उपचार सुरू होते, परंतु तिच्यावर करण्यात येणाऱया हृदयशस्त्रक्रियेसाठी पावणेतीन लाखांचा खर्च येणार होता. पर्णवीच्या कुटुंबीयांची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने एवढा मोठा खर्च तिच्या कुटुंबीयांच्या आवाक्याबाहेरचा होता. त्यामुळे गेल्या पाच महिन्यांपासून तिची शस्त्रक्रिया रखडली. अखेर लेकीचा जीव वाचविण्यासाठी तिच्या वडिलांनी शिवसेना भवन गाठून जनता दरबारात नितीन नांदगावकर यांच्यासमोर आपली व्यथा मांडली. शिव आरोग्य सेनेचे समन्वयक सचिव मिलिंद वेदपाठक यांनी हर्षल प्रधान यांच्या मार्गदर्शनाखाली वेगवेगळय़ा स्तरावर चर्चा केली. त्यामुळे अवघ्या दोन दिवसांतच लोकमान्य टिळक रुग्णालयात तिच्यावर निःशुल्क शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडली.