हृदयविकार समज-गैरसमज

>> राजाराम पवार

तरुण वयातच अचानक हृदयविकाराचा झटका येण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोना काळात घेतलेल्या लसीमुळे हृदयविकाराचा झटका येत असल्याच्या चर्चा सध्या नागरिकांमध्ये सुरू असली तरी अद्याप कोणताही वैद्यकीय अभ्यासात्मक पुरावा समोर आलेला नाही. त्यामुळे नागरिकांनी भीती बाळगू नये, असे आवाहन तज्ज्ञांनी केले आहे. वाढता ताणतणाव, बदललेली जीवनशैली, मधुमेहाचे वाढते प्रमाण यासारखे अनेक फॅक्टर तरुण वयात हृदयविकर उद्भवण्यास कारणीभूत ठरत असल्याचे तज्ज्ञांनी स्पष्ट केले.

पूर्वी उतरत्या वयामध्ये हृदयविकाराचा धोका उद्भवत होता. मात्र, अलीकडच्या काळात अचानक हृदयविकाराचा धोका उद्भवून मृत्यू होण्याचे प्रमाण वाढले आहे. यात तरुणांचे प्रमाण सर्वाधिक आहे. रंगमंचावर नृत्य करताना किंवा जिममध्ये व्यायाम करताना हृदयविकाराचा झटका येऊन मृत्यू होण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. मागील आठवड्यामध्ये एक तरुणी नृत्य करताना अचानक खाली कोसळली आणि तिचा मृत्यू झाल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. कोरोना लसीमुळे या तरुणीला हृदयविकाराचा झटका आल्याचा दावा डॉक्टरांनी केला होता. तसेच कोरोना काळात ज्यांना कोरोनाचा संसर्ग झाला होता किंवा ज्यांनी कोरोनाची लस घेतली आहे, अशा काही रुग्णांच्या रक्तवाहिन्यांमध्ये रक्ताच्या गुठळ्या होणे, इतर प्रकारचा त्रास जाणवणे, अचानक हृदयविकाराचा झटका येणे यासारख्या समस्या निर्माण होत असल्याचा दावा काही डॉक्टरांनी केला आहे, तर दुसरीकडे कोरोना लसीमुळे आरोग्यावर परिणाम होत असल्याचे किंवा हृदयविकाराची समस्या निर्माण होत असल्याचे अद्याप कोणत्याही वैद्यकीय अभ्यासातून स्पष्ट झाले नसल्याचे काही डॉक्टरांचे म्हणणे आहे.

कोरोना महामारीत घेतलेल्या लसीचे आरोग्यावर परिणाम होत असल्याचे बोलले जात असल्यामुळे सध्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. परंतु, कोरोना आजारात रक्ताभिसरणावर परिणाम झाला असेल तर अशाप्रकारची एखादी घटना घडू शकते. मात्र, लसीमुळे हृदयविकार उद्भवू शकतो यासंदर्भातील कोणतेही अभ्यासात्मक पुरावे समोर आले नाहीत. सध्याची बदलले ली जीवनशैलीच त्याला कारणीभूत असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.

बदललेली जीवनशैली, वाढलेला ताणतणाव, मधुमेह यासारखे फॅक्टर तरुणवयात हृदयविकार उद्भवण्यास कारणीभूत ठरत आहेत. कोरोना आजार किंवा कोरोना लसीमुळे हृदयविकाराची समस्या उद्भवत असल्याचा कोणताही वैद्यकीय अभ्यासात्मक पुरावा समोर आलेला नाही.
– डॉ. धैर्यशील कणसे, हृदयविकार तज्ज्ञ

कोरोना महामारीच्या आधीही हृदयविकाराचा धोका उद्भवल्याच्या घटना घडत होत्या. कोरोना लसीमुळे हृदयविकार उद्भवत असल्याचा पुरावा समोर आलेला नाही. कोरोना आजारात रक्ताभिसरणामध्ये परिणाम झाला असेल, तर अशा प्रकारची एखादी घटना घडू शकते. मात्र, लसीमुळे हृदयविकाराचे प्रमाण वाढत असल्याचा समज चुकीचा आहे.
– डॉ. संजय पाटील, अध्यक्ष, हॉस्पिटल बोर्ड ऑफ इंडिया, पुणे शाखा