महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक नोव्हेंबरमध्ये होण्याची शक्यता असताना मिंधे गटाच्या गद्दार आमदारांच्या अपात्रतेचा फैसला अद्याप झालेला नाही. पक्षाच्या धोरणाशी गद्दारी केलेल्या मिंधे गटाच्या आमदारांना अपात्र करण्याची मागणी करीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने सर्वेच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. ही याचिका येत्या मंगळवारी सरन्यायाधीशांच्या नेतृत्वाखालील त्रिसदस्यसीय खंडपीठापुढे सूचिबद्ध झाली आहे.
महाराष्ट्रात घटनाबाह्य सरकार स्थापन करण्यासाठी मिंधे गटाने शिवसेनेशी गद्दारी केली आणि भाजपशी हातमिळवणी करून सत्तेत स्थान मिळवले. एकनाथ शिंदे यांच्या मिंधे गटातील गद्दार आमदारांच्या अपात्रतेसंबंधी निर्णय घेण्यासाठी सर्वेच्च न्यायालयाने महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना निर्देश दिले होते. त्यांनी मिंधे गटाच्या आमदारांना अपात्र केले नाही. नार्वेकर यांच्या त्या निर्णयाला शिवसेनेचे मुख्य प्रतोद सुनील प्रभू यांनी सर्वेच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. शिवसेनेची याचिका मंगळवारी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड, न्यायमूर्ती जे. बी. पारडीवाला आणि न्यायमूर्ती मनोज मिश्रा यांच्या खंडपीठापुढे सुनावणीसाठी सूचिबद्ध झाली आहे. महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक नोव्हेंबरमध्ये होण्याची शक्यता आहे. या निवडणुकीपूर्वी गद्दार आमदारांच्या अपात्रतेचा फैसला करण्याची विनंती शिवसेनेने केली आहे. त्यावर सर्वेच्च न्यायालय अंतिम सुनावणीसाठी तयार झाले होते. मात्र गेल्या काही महिन्यांत वेळेअभावी सुनावणीला मुहूर्त न मिळाल्याने गद्दार आमदारांचा फैसला कधी होणार, असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.
तारीख पे तारीख…
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या निर्णयाला आव्हान देत शिवसेनेने एकनाथ शिंदे व त्यांच्या मिंधे गटातील 39 आमदारांविरुद्ध याचिका दाखल केली आहे. जानेवारीमध्ये ही याचिका दाखल केली होती. तेव्हापासून पुढील नऊ महिने याचिकेवर ’तारीख पे तारीख’चे सत्र सुरू आहे. सर्वेच्च न्यायालय गद्दार आमदारांच्या अपात्रतेचा अंतिम निर्णय कधी देणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.
महाराष्ट्र सरकारविरोधातील विविध याचिका सर्वेच्च न्यायालयात प्रलंबित आहेत. एकनाथ शिंदेंचे सरकार संवैधानिक आहे कि असंवैधानिक? राहुल नार्वेकर यांचा निर्णय कायद्याला धरून आहे का? याचा फैसला सर्वेच्च नायालय करणार आहे. सरन्यायाधीशांच्या न्यायिकतेबद्दल लोकांना अजून विश्वास आहे. परंतु, घटनाबाह्य पद्धतीने व शंकास्पद प्रक्रियांचा वापर करून मुख्यमंत्री पदावर बसलेल्या एकनाथ शिंदे यांच्यासोबत एकाच मंचावर येण्यामुळे सरन्यायाधीशांची प्रतिमा मलीन होते. सरन्यायाधीशांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत एकाच मंचावर बसणे टाळले पाहिजे होते. – अॅड. असीम सरोदे, कायदेतज्ञ
सरन्यायाधीश व एकनाथ शिंदे आज एकाच मंचावर
मुंबई उच्च न्यायालयाच्या नवीन वास्तूच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम सोमवारी वांद्रे येथे होत आहे. या कार्यक्रमासाठी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड उपस्थित राहणार आहेत. ‘ताज लॅण्डस् अँड’ हॉटेलमध्ये होणाऱ्या कार्यक्रमात सरन्यायाधीश चंद्रचूड व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे एकाच व्यासपीठावर येणार आहेत.