
पोलीस कोठडीनंतर न्यायालयीन कोठडीत असलेल्या नागपूरच्या शिवशंभूद्रोही प्रशांत कोरटकरचा जामीन अर्ज प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी फेटाळल्यानंतर आता जिल्हा व सत्र न्यायालयात पुन्हा जामिनासाठी अर्ज दाखल केला आहे. येत्या सोमवारी 7 एप्रिल रोजी यावर सुनावणी होणार आहे.
इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना धमकीचा फोन करणाऱ्या कोरटकरने छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्ये केली होती. त्याचे पडसाद राज्यभर उमटले. येथील जुना राजवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर तो पोलीस संरक्षण असतानाही पळून गेला होता. महिनाभराने त्याला तेलंगणा राज्यातून कोल्हापूर पोलिसांनी ताब्यात घेऊन न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याला पहिल्यांदा पाच दिवसांची, त्यानंतर तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. यावेळी पोलीस तपासात त्याला मदत केलेल्या चार ते पाच संशयितांची नावे समोर आली. तसेच पळून जाण्यासाठी त्याने वापरलेली दोन्ही चारचाकी वाहने पोलिसांनी जप्त केली आहेत. कोरटकरने प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांकडे केलेल्या जामीन अर्जावर 1 एप्रिलला युक्तिवाद झाला. सहदिवाणी न्यायाधीश एस. एस. तट यांनी त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत केल्याने तो सध्या कळंबा कारागृहात आहे. सुरक्षेच्या कारणास्तव त्याला अंडा बरॅकमध्ये स्वतंत्र ठेवण्यात आले आहे.
दरम्यान, कोरटकरच्या वकिलांनी आज जिल्हा व सत्र न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला असून, यावर आता सोमवार, दि.7 एप्रिल रोजी दोन्ही बाजूच्या वकिलांचा युक्तिवाद होणार आहे. यावेळी सरकारी वकील, पोलीस व बचावपक्ष आपले म्हणणे मांडणार आहे. पोलिसांसह सरकारी वकील जामिनाला नामंजूर होण्यासाठी युक्तिवाद करतील. तसेच बचाव पक्षाकडूनही युक्तिवाद झाल्यानंतर कोरटकरच्या जामिनाचा निर्णय होण्याची शक्यता आहे.