
डासांचे साम्राज्य पसरल्याने साथीच्या आजारांनी थैमान घातल्याने देवळाली प्रवरा व राहुरी फॅक्टरी शहरवासीय हतबल झाले आहेत. वैष्णवी चौक युवा प्रतिष्ठानचे संस्थापक वसंत कदम व अविनाश वरखडे हे गोचीड तापाने रुग्णालयात उपचार घेत असून आज सोमवारी सकाळी हाताला सलाईन लावलेल्या अवस्थेत रुग्णवाहिकेतून देवळाली प्रवरा नगरपालिका आवारात पोहोचून तात्काळ तणनाशक व डास प्रतिबंधात्मक फवारणी करा अशी मागणी पालिकेला केली आहे.यावेळी वैष्णवी चौक प्रतिष्ठानचे अध्यक्ष,सदस्य व नागरीक उपस्थित होते. या अनोख्या आंदोलनाची सर्वत्र चर्चा होत आहे.
देवळाली प्रवरा व राहुरी फॅक्टरी परिसरात डासांचे प्रमाण वाढल्याने साथीच्या आजाराने थैमान घातले आहे.डेंग्यू, मलेरिया, गोचीड ताप आजाराचे रुग्ण वाढत आहे. राहुरी फॅक्टरी येथील वैष्णवी चौक प्रतिष्ठांच्या संस्थापक अध्यक्ष वसंत कदम व सदस्य अविनाश वरखडे हे गेल्या तीन दिवसापासून गोचीड तापामुळे राहुरी फॅक्टरी येथील डॉ.रवी घुगरकर यांच्या मातोश्री हॉस्पिटल येथे उपचार घेत आहे.दरम्यान आज मातोश्री हॉस्पिटलमधून वसंत कदम व अविनाश वरखडे हे रुग्णवाहिका चालक रवी देवगिरे यांच्या रुग्णवाहिकेतून हाताला सलाईन लावलेल्या अवस्थेत थेट देवळाली प्रवरा नगरपालिकेच्या आवारात पोहोचले. तातडीने फवारणी करा, या साथीच्या आजारापासून नागरिकांची मुक्तता करा अशी मागणी देवळाली नगरपालिकडे केली आहे. यावेळी मुख्याधिकारी विकास नवाळे व आरोग्य विभाग प्रमुख कृष्णा महांकाळ यांना वैष्णवी चौक युवा प्रतिष्ठानच्या सदस्यांसह नागरिकांनी निवेदन देऊन तातडीने तणनाशक व डास प्रतिबंधात्मक फवारणी न केल्यास तीव्र आंदोलन छेडु असा इशारा दिला आहे. यावेळी अमोल कदम,मनोज कदम,धनंजय विटनोर, राजुभाई शेख,सुरेश कणसे,महेंद्र दोंड,मनोज गावडे,दिलीप गागरे,शिरीष मोरे,सुहास वरखडे,भाऊसाहेब वाणी व नागरिक उपस्थित होते.