Share market मध्ये ‘बुल रन’मुळे उत्साह; 5 दिवसात गुंतवणूकदारांची 50 हजार कोटींची कमाई

सुमारे सहा महिन्यांच्या घसरणीनंतर गेल्या आठवड्यात शेअर बाजारात तेजी दिसून आली. या तुफानी तेजीमुळे शेअर बाजारात बुल रन सुरू झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. गेल्या आठवड्यात शेअर बाजारात सेन्सेक्स आणि निफ्टीने वेग पकडला. त्यामुळे गुंतवणूकदारांमध्येही उत्साह दिसून आला. बँकिंग शेअर्समध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना या बुल रनचा जबरदस्त फायदा झाला आहे. पाच दिवसात गुतंवणूकदारांची 50 हजार कोटींची कमाई झाली आहे.

गेल्या आठवडा शेअर बाजारासाठी खूप सकारात्मक ठरला. बाजारातील तेजीमुळे मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 3,076.6 अंकांनी म्हणजेच 4.16 टक्क्यांनी वधारला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 95.3 अंकांनी म्हणजेच 4.25 टक्क्यांनी वधारला आहे. सेन्सेक्सच्या टॉप 10 पैकी 9 कंपन्यांचे बाजारमूल्य मोठ्या प्रमाणात वाढले आहे. एचडीएफसी बँक आणि आयसीआयसीआय बँकेच्या शेअरमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची जबरदस्त कमाई झाली आहे.

आयसीआयसीआय बँकेचे मार्केट कॅप 64,426.27 कोटी रुपयांनी वाढून 9.47 लाख कोटी रुपयांवर पोहोचले. दूरसंचार क्षेत्रातील दिग्गज कंपनी भारती एअरटेल दुसऱ्या क्रमांकावर राहिली. एअरटेलचे बाजारमूल्य 53,286.17 कोटी रुपयांनी वाढून सुमारे 9.84 लाख कोटी रुपये झाले. एचडीएफसी बँकेच्या शेअर्समध्येही मोठी वाढ झाली आहे. गेल्या आठवड्यातील फक्त पाच दिवसांत एचडीएफसी बँकेने आपल्या गुंतवणूकदारांना 49,105.12 कोटी रुपयांची मोठी कमाई करून केली.

शेअर बाजारातील तेजीच्या काळात, देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांच्या नेतृत्वाखालील रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडनेही गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. एसबीआयपासून ते इन्फोसिसपर्यंत, सगळेच नफ्यात आहेत. देशातील सर्वात प्रभावशाली कंपन्यांच्या यादीत मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीजने बाजार भांडवलाच्या बाबतीत अव्वल स्थान कायम ठेवले आहे. यानंतर, दुसरी सर्वात मोठी कंपनी एचडीएफसी बँक ठरली होती. तर तिसरी टीसीएस होती. त्यानंतर अनुक्रमे भारती एअरटेल, आयसीआयसीआय बँक, एसबीआय, इन्फोसिस, बजाज फायनान्स, हिंदुस्तान युनिलिव्हर आणि आयटीसी यांचा क्रमांक लागतो.

बाजारात गेल्या आठवड्यात तेजी दिसून आली असली तरी सोमवारी बाजाराची सुरुवात कशी होते, यावर पुढची दिशा ठरणार आहे. आता आगामी काळात तेजी कायम राहील, असे तज्ज्ञांचे मत आहे. तर बाजाराच्या तेजीच्या काळात परकीय संस्थात्मक गुंतवणूकदार काय भूमिका घेतात, यावरही बाजाराची पुढील दिशा ठरणार आहे. मात्र, बाजारात आता उत्साहाचे वातावरण असून गुंतवणूकदार तेजीसाठी तयार असल्याचे दिसून येत आहे.