ब्राह्मण जोडप्यांनी चार मुलांना जन्म दिल्यास त्यांना एक लाख रुपये दिले जातील, असे मध्य प्रदेशच्या परशुराम कल्याण बोर्डाचे अध्यक्ष पंडित विष्णू राजोरिया यांनी सांगितले. आज इंदूरमधील एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी ही घोषणा केली. सध्या जोडप्यांचा कल हा केवळ एका मुलाला जन्म देण्याकडे आहे. मात्र सनातन धर्माच्या रक्षणासाठी चार मुलांना जन्म द्यावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. कॅबिनेट दर्जा प्राप्त असणारे राजोरिया यांच्या या विधानाची बरीच चर्चा रंगली आहे.
‘‘ब्राह्मण जोडप्यांनी चार मुलांना जन्म देणे ही काळाची गरज आहे. शिक्षण महागल्यामुळे युवा पिढी एकाच मुलाला जन्म देऊन थांबते अशी तक्रार केली जाते. पण यामुळे अनेक अडचणी उत्पन्न होत आहेत. तरुणांनी कसेतरी दिवस काढावेत, मात्र मुलांना जन्माला घालण्यात मागे राहता कामा नये. ज्येष्ठांकडून काही अपेक्षा ठेवू शकत नाही म्हणूनच मी युवकांना हे आवाहन करीत आहे. मी परशुराम कल्याण मंडळाचा अध्यक्ष असलो तरी एक लाख रुपये देण्याचा निर्णय माझा वैयक्तिक आहे,’’ असे राजोरिया यांनी स्पष्ट केले.