Hathras Stampede : गुप्तचर विभागात नोकरी, देवाचा दृष्टांत अन् सत्संग; हाथरस प्रकरणातील भोलेबाबा कोण आहेत?

उत्तर प्रदेशमधील हाथरस येथे मंगळवारी एका संत्संग कार्यक्रमात चेंगराचेंगरी होऊन 121 भाविकांचा मृत्यू झाला, तर दीडशेहून अधिक जण जखमी झाले. मृतांमध्ये 108 महिला, तर 7 लहान मुलांचा समावेश आहे. जखमींची संख्याही जास्त असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. हाथरथपासून 47 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या फुलरई गावामध्ये भोलेबाबा यांच्या संत्संग कार्यक्रमात ही घटना घडली.

हाथरसमध्ये घडलेल्या दुर्घटनेमुळे भोलेबाबा चर्चेत आले आहेत. नेहमी माध्यमांपासून लांब राहणारे भोलेबाबा आहेत तरी कोण? असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल. तर विश्व हरी भोलेबाबा यांचे खरे नाव सूरज पाल उर्फ नारायण साकार हारी असे आहे. ते काही वर्षे उत्तर प्रदेश पोलीस खात्यात गुप्तचर विभागात नोकरी करत होते. मात्र त्यांनी ही नोकरी सोडून पूर्णवेळ सत्संग कार्यक्रम सुरू केले. उत्तर प्रदेश, राजस्थान आणि मध्य प्रदेशमध्ये त्यांचे लाखो अनुयायी आहेत.

विश्व हरी भोलेबाबा हे कासगंजच्या पटियाली येथील रहिवासी आहेत. ते उत्तर प्रदेश पोलीस खात्यात गुप्तचर विभागामध्ये नोकरीला होते. मात्र त्यांनी अचानक नोकरी सोडली आणि देवाचा दृष्टांत झाल्याचे म्हणत एका झोपडीत राहून सत्संग सुरू केला. यानंतर गावोगाव जाऊन त्यांनी सनातन धर्म आणि भक्तीमार्गाचे प्रचार सुरू केला. पुढे ठिकठिकाणी त्यांच्या सत्संगाच्या कार्यक्रमाचे आयोजन होऊ लागले. आज त्यांचे लाखो अनुयायी असून त्यांच्या प्रवचनालाही प्रचंड गर्दी होते.

सुटाबुटातील भोलेबाबा

सूरज पाल उर्फ नारायण साकार हारी उर्फ विश्व हरी भोलेबाबा यांचे राहणीमान इतर संत, बाबा यांच्याहून वेगळे आहे. साधारणत: संत, महाराज धोती, कुर्ता किंवा भगव्या वस्त्रांमध्ये दिसतात. मात्र भोलेबाबा हे नेहमी पांढऱ्या रंगाच्या पॅँट-शर्टमध्ये असतात आणि सिंहासनावर बसून प्रवचन देतात. त्यांचे अनुयायीही गुलाबी पँट-शर्ट आणि पांढरी टोपी घालतात. पाखंडला विरोध करत मानव सेवा हिच ईश्वरसेवा आहे असा संदेश भोलेबाबा देतात.

हाथरसमध्ये नक्की काय घडलं?

हाथरस जिल्ह्यातील सिकंदराबाद पोलीस स्थानकांतर्गत येणाऱ्या फुलरई गावातील शेतामध्ये भोलेबाबा यांच्या संत्संगाचे आयोजन करण्यात आले होते. सत्संग संपल्यानंतर भोलेबाबा यांचा ताफा निघाल्यानंतर चेंगराचेंगरी झाली. भोलेबाबा यांची गाडी बाहेर पडल्यानंतर लोकांनी कारच्या दिशेने धाव घेतली आणि चेंगराचेंगरी होऊन 100 हून अधिक जणांचा मृत्यू झाला.

गुन्हा दाखल

दरम्यान, सत्संगाचे आयोजन करणाऱ्यांवर पोलिसांनी गुन्हा दाखलर केला आहे. भारतीय न्याय संहिता 2023च्या कलम 105, 110, 126, 116(2), 223 आणि 238 अंतर्गत मुख्य सेवेदार असलेले देवप्रकाश मधुकर आणि इतर आयोजकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याचे वृत्त ‘एएनआय’ने दिले आहे.