भोलेबाबाच्या सहा सेवेकऱ्यांना अटक; दोन महिलांचा समावेश, बाबा अजूनही मोकाट

उत्तर प्रदेशातील हाथरस येथे झालेल्या चेंगराचेंगरीप्रकरणी भोलेबाबा ऊर्फ सुरज पाल याच्या सहा सेवेकऱ्यांना अटक करण्यात आली आहे. भोलेबाबा याला मात्र अद्याप अटक करण्यात आलेली नाही. भोलेबाबाच्या सत्संगात चेंगराचेंगरीची घटना घडली. असे असूनही भोलेबाबाला अद्याप ताब्यात घेण्यात आले नसून गरज पडल्यास त्याचीही चौकशी करू असे उत्तर पोलिसांनी दिले आहे. अलीगढचे पोलिस महानिरीक्षक शलभ माथूर यांनी याप्रकरणात आतापर्यंत सहा जणांना अटक केल्याची माहिती दिली. दरम्यान, चेंगराचेंगरीत आतापर्यंत तब्बल 121 भाविकांचा मृत्यू झाला आहे.

तपास अद्याप सुरु असून येणाऱया काही दिवसात आणखी काही जणांना अटक करण्यात येईल, असेही शलभ माथुर यांनी सांगितले. शलभ यांच्या पत्रकार परिषदेपूर्वी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही या प्रकरणातील तपासाबाबतची माहिती घेतली. दोषींना कुठल्याही परिस्थितीत सोडणार नाही, असे त्यांनी म्हटले आहे. दरम्यान, भोलेबाबाबाचा चेंगराचेंगरीतील घटनेत हात होता की नाही, याबाबत कोणत्याही निष्कर्षाप्रत आताच पोहोचता येणार नाही असेही शलभ माथुर म्हणाले. दरम्यान, वेद प्रकाश मधुकर नावाच्या व्यक्तीला अटक करण्यासाठी पोलिसांची पथके तयार करण्यात आली असून त्याच्यावर 1 लाख रुपयांचे बक्षिसही जाहीर करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. मधुकरच्या चौकशीत आणखी नावे उघड झाली तर त्यांनाही तुरुंगात टाकण्यात येईल असेही ते म्हणाले.