हाथरस चेंगराचेंगरीत आरोपीचे राजकीय कनेक्शन, निधीचा होणार तपास; 14 दिवसांची पोलीस कोठडी

हाथरस चेंगराचेंगरीतील मुख्य आरोपी देव प्रकाश मधुकर निधी गोळा करायचा. त्याला काही राजकीय पक्षांनी संपर्क केला होता. राजकीय पक्षांनी काही निधी दिला होता का याची चौकशी पोलीस करणार आहेत. शनिवारी मुख्य न्यायदंडाधिकारी यांनी मधुकरला 14 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

मधुकरला दंडाधिकारी न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयीन कोठडीचे आदेश झाल्यानंतर मधुकर व त्याचा सहकारी संजीव यादवची अलिगड तुरुंगात रवानगी करण्यात आली. न्यायालयात माध्यमांच्या प्रतिनिधींनी मधुकरला घेराव घातला. पोलीस त्याला तेथून बाहेर काढत होते. त्यावेळी तो तोंडावर पडला. मधुकरला शुक्रवारी रात्री दिल्लीतील नजफगड येथून अटक करण्यात आली.

बाबा दुःखी

चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर भोलेबाबा शनिवारी पहिल्यांदाच समोर आले. या घटनेने आम्ही खूप दुःखी आहोत. गैरप्रकार करणाऱयांना सोडले जाणार नाही, असा विश्वास बाबाने व्यक्त केला.

निधीचा तपास सुरू

आरोपी मधुकरने निधी कसा गोळा केला. त्याला निधी देणारे कोण होते. त्यामागे कोणता राजकीय पक्ष आहे का, या सर्वाचा तपास केला जात असल्याची माहिती एसपी निपुण अग्रवाल यांनी दिली.

 भाजप नेत्याने दाखल केली तक्रार

भाजप नेते कृष्ण कुमार सिंह कल्लू यांनी सूरज पाल सिंह ऊर्फ भोलेबाबा विरोधात पाटणा दिवाणी न्यायालयात खासगी तक्रार दाखल केली आहे.

न्यायिक आयोगाने केली पाहणी

सत्संग स्थळाची शनिवारी न्यायिक आयोगाने पाहणी केली. हाथरसचे डीएम आशीष कुमार, सीडीओ साहित्य प्रकाश मिश्रा, एसएडीएम रवींद्र कुमार, सीओ डॉ. आनंद कुमार आणि इतर अधिकारी टीमसोबत होते. आम्ही संपूर्ण सत्संग स्थळाची पाहणी केली. तेथील दरवाजे पाहिले. आवश्यक असेल त्यांची चौकशी केली जाईल. चौकशी अहवाल सादर करण्यासाठी दोन महिन्यांचा अवधी आम्हाला देण्यात आला आहे. या मुदतीत अहवाल सादर करण्याचा प्रयत्न केला जाईल, असे अलाहाबाद उच्च न्यायालयाचे निवृत्त न्या. ब्रिजेश कुमार श्रीवास्तव यांनी सांगितले.