सर्वसामान्यांप्रमाणे सेलिब्रेटीदेखील म्हाडाच्या घरांसाठी इच्छुक असून ‘फिल्टरपाड्याचा बच्चन’ अशी ओळख असलेल्या ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम गौरव मोरे यानेदेखील म्हाडाच्या घरासाठी अर्ज भरला आहे. ज्या पवईतील फिल्टरपाड्यात गौरव लहानाचा मोठा झाला त्याच पवईत त्याने उच्च उत्पन्न गटातील घरासाठी अर्ज भरला आहे.
म्हाडाने मुंबईतील 2030 घरांसाठी सोडत जाहीर केली असून शुक्रवारी प्रारूप यादी जाहीर केली. त्यानुसार कलाकार कोटय़ातून घर घेण्यासाठी अनेक कलाकार इच्छुक असल्याचे समोर आले. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ म्हणून घराघरात पोहोचलेल्या निखिल बने याने पहाडी गोरेगाव आणि कन्नमवार नगर येथील घरांसाठी अर्ज भरले आहेत. ‘देवमाणूस’, ‘तू चाल पुढं’ फेम अभिनेत्री वैष्णवी कल्याणकर आणि ‘पुन्हा कर्तव्य आहे’ फेम अभिनेत्री अक्षया हिंदळकर या पहाडी गोरेगाव येथील घरासाठी इच्छुक आहेत. किशोरी वीज, सीमा देशमुख, निपुण धर्माधिकारी, गौतमी देशपांडे, शंतनू रोडे यांनी उच्च उत्पन्न गटातील घरासाठी अर्ज केले आहेत. येत्या 8 ऑक्टोबर रोजी यशवंतराव चव्हाण सेंटरला घरांसाठी लॉटरी काढण्यात येणार आहे. त्या वेळी सर्वसामान्यांसोबत कोणत्या कलाकाराचे गृहस्वप्न साकार होणार हे कळणार आहे.