सिनेमा – गुंगवणारी दुसरी हसीन दिलरुबा

>> प्रा. अनिल कवठेकर

कादंबरीत वाचलेल्या खुनाच्या प्लाटनुसार जीवनात खुनाचे केलेले नियोजन आणि त्या नियोजनावर मात करणारी आणखी एक तशीच व्यक्ती भेटली तर काय होऊ शकते याचे गुंगवणारे चित्रण म्हणजे ‘फिर आई हसीन दिलरुबा’! एखादा चित्रपट चालल्यानंतर त्याचा दुसरा भाग येतो, पण पहिल्या भागाला जे यश प्राप्त होतं ते दुसऱया भागाला प्राप्त होत नाही. कारण पहिल्या कथेमध्ये अनेक धक्के मिळालेल्या प्रेक्षकांना दुसऱया कथेत त्याहीपेक्षा खूप काही वेगळं पाहण्याची अपेक्षा असते. त्या बाबतीमध्ये ‘फिर आई हसीन दिलरुबा’ हा चित्रपट यशस्वी ठरला आहे. याची कथा टप्प्याटप्प्यावर इतक्या गोंधळात टाकते की, शेवटी काय घडू शकेल याचा अंदाज येत नाही आणि कथा तुम्हाला गुंतून राहण्यास भाग पाडते.

हा चित्रपट पाहण्यापूर्वी याचा पहिला भाग पाहणं आवश्यक आहे. कारण कथेची सुरुवात तिथूनच सुरू होते. आपलाच खून झालेला आहे असं भासवून जगणारा रिशू (विक्रांत मेस्सी) आणि त्याची पत्नी राणी (तापसी पन्नू) एकाच शहरात राहून एकमेकांच्या संपर्कात न येता जगत असतात. त्यांना परदेशात निघून जायचं आहे. ते परदेशी जाण्यात यशस्वी होतात का? याचा शोध घेणारी ही कथा आहे.

‘हसीना दिलरुबा’ या पहिल्या चित्रपटात असणारी उत्कंठावर्धक कथा आणि त्यातील गूढता तशीच टिकवत चित्रपट सुरू होतो. रात्रीचा अंधार, कोसळणारा पाऊस आणि भिजलेली नायिका धावत धावत पोलीस स्टेशनमध्ये जाते आणि सांगते के, मला माझ्या पतीपासून वाचवा.

… आणि दोन महिन्यांपूर्वीचा फ्लॅशबॅक सुरू होतो. आग्रा शहरातलं राणीचं घर. त्या घराच्या मालकिणीला इन्सुलेशन द्यायला कंपाऊंडर येतो. त्याची पहिलीच भेट राणीशी होते. तो तिच्याकडे आकर्षित होतो. ती ब्युटिशियन आहे. दोन्ही हातात विग्ज लावलेले छोटे पुतळे घेऊन ती पायऱया उतरत असते. एवढय़ात तिला फोन येतो. ती हातातलं सामान विसरून निघून जाते. ते विसरलेले पुतळे घेऊन तो कंपाऊंडर तिच्या मागे वेडय़ासारखा धावतोय. ती त्याला दोन मिनिटांत येते सांगून विसरून जाते. हा दिवसभर पावसात भिजत तिची वाट पाहात राहतो. पहिल्याच भेटीत तो तिला  “सिनेमाला जाऊ या का?’’ असं विचारतो आणि ती पटकन होकार देते. इथे पारंपरिक प्रेम नाही. एकमेकांकडे पाहत बसणं नाही, खाणाखुणा नाहीत की गाणं नाही. कारण हे सर्व दाखवायला दिग्दर्शकाकडे वेळच नाही… आणि गाणं सुरू होतं…‘एक हसीना थी, एक दिवाना था…’

पहिल्या भागापासून पोलीस राणी आणि रिशूच्या मागावर आहेत आणि दोघे एकमेकांच्या छुप्या संपर्कात आहेत. त्यांचा थायलंडला पळून जाण्याचा प्लॅन आहे. त्याचा एक हात कृत्रिम आहे. त्याच्या प्रेमात पूनम नावाची एक अपंग मुलगी आहे. ती अगदी स्पष्ट बोलणारी आहे. “माझा एक पाय नाही, तुझा एक हात नाही. आपली जोडी खूपच छान जमेल.’’ प्रत्येकाच्या प्रेमाच्या व्याख्या अगदी ठरलेल्या आहेत आणि ते सांगायला ते वेळ घेत नाहीत. लगेच सांगून टाकतात. शिवाय त्यांना प्रेमाबरोबर शारीरिक आकर्षण जास्त आहे, जे प्रेक्षकांसाठी  नवीन आहे.

कंपाऊंडर अभिमन्यू (सन्नी कौशल) संपूर्ण थिएटरची तिकिटं विकत घेऊन राणीची वाट पाहतो आणि ती येत नाही. दुसऱया दिवशी तो तिला आठवण करून देतो तेव्हा तिच्या लक्षात येतं की, आपण याला वेळ दिली होती; तो पुन्हा तिला सिनेमाला जाऊ या असं विचारतो. वाट पाहण्याला त्याची हरकत नसते. प्रेमात पडल्यावर जे होतं ते त्याचं झालेलं असतं. नवरा रिशूशी अंतर ठेवून बोलत असताना राणीची पर्स चोरीला जाते आणि पोलीस ती पर्स घेऊन तिच्या घरी येतात. इन्स्पेक्टर किशोर – पहिल्या भागात खुनाचा तपास करणारा – तोच इन्स्पेक्टर येतो आणि इथून नव्या शोधाला सुरुवात होते. गूढ उलगडणार का? आता काय होणार? इन्स्पेक्टर तिला कळेल अशा भाषेत सांगतो की, तुला तुझा भूतकाळ शोधतोय. कारण त्यानेसुद्धा ती कादंबरी वाचलेली आहे. त्याचा शेवट त्याला माहीत आहे. त्या कादंबरीतल्या प्लाटनुसार घडत असल्याची त्याला खात्री आहे. त्याला फक्त ते पुराव्यासह सिद्ध करायचं आहे.

रिशू आणि राणी सिनेमाला जातात. लांब बसून एकमेकांशी मोबाइलवर बोलत असताना रिशूला तिथे इन्स्पेक्टर दिसतो. तो धावत घरी जातो आणि सिमकार्ड फेकून देतो. तिचा आणि त्याचा संपर्क तुटतो. तिच्या घराजवळ दोन पोलीस टेहळणीसाठी असतात. तिच्या दुकानासमोर उभ्या राहिलेल्या कचऱयाच्या गाडीच्या मागच्या बाजूला तिचं लक्ष जातं आणि तिला तिथे संदेश दिसतो… ‘जुडेंगे जब दिल से दिलों के तार राह लेंगे दिल्लगी पर!’ ड्रायव्हर सांगतो की, एकाने त्याला पैसे देउढन तिच्या पार्लरसमोर एक तास उभं राहायला सांगितलंय. तो रिशूचा संदेश असल्याचं ती पटकन ओळखते. कादंबरीचा आधार घेऊन ती त्याला पीसीओवरून कॉल करते. रिशू तिला समजावून सांगतो की, त्याच्याकडे कोणताही पुरावा नाही. फक्त तिला हिंमत दाखवायची आहे. कचऱ्याच्या गाडीवरचा संदेश ही एका चांगल्या दिग्दर्शकाची कल्पना आहे. रिशूच्या अंदाजाप्रमाणे तिला पोलीस स्टेशनमधून चौकशीसाठी बोलावलं जातं. तिथे मृत्युंजय पासवान (जिमी शेरगिल) याचा प्रवेश होतो आणि तो राणीला सांगतो की, तो नीलचा काका आहे (संदर्भ – पहिला भाग). राणीसमोर आणखी एक आव्हान उभं राहतं. पोलिसांना रिशू याच शहरात असल्याची खात्री असते. ज्या भागात राणी राहत असते तिथे आसपास रिशूचा शोध चालू असतो. जी पूनम नावाची अपंग मुलगी रिशूवर प्रेम करते, तिच्यापर्यंत पोलीस पोहोचतात. ती रिशूला प्रेमासाठी ब्लॅकमेल करते आणि पोलिसांना फुटवते. अपंग असूनही ब्लॅकमेल करणारी पूनम… यात वेगवेगळय़ा तऱहेने प्रेम करणाऱयांचे नमुने पाहायला मिळतात.

पासवान ट्रव्हल एजंटला पकडून नेतो. इन्स्पेक्टर पासवान तिचा संशय येऊ नये म्हणून राणी अभिमन्यूसोबत नवं प्रेमप्रकरण सुरू करते. त्याच्याशी लग्न करते. कारण हा  राणी-रिशूच्या जगण्याचा आणि पोलिसांपासून लपण्याचा नवीन प्लॅन असतो. अभिमन्यू… हा तोच प्रेमी कंपाऊंडर! महाभारतातला अभिमन्यू जसा कौरवांच्या चक्रव्यूहात फसला होता तसा हा अभिमन्यू राणीने तयार केलेल्या प्रेमाच्या चक्रव्यूहात फसणार असल्याचा अंदाज येतो. “माझ्याशी लग्न करशील का?’’ हा तिचा प्रश्न ऐकताच अभिमन्यू उडतो आणि म्हणतो, “सरळ लग्न! प्रेम कधी करायचं?’’ इन्स्पेक्टर किशोर आणि पासवान त्या लग्नाला हजर असतात. कारण त्यांना संशय असतो की, रिशू तिथे कोणत्याही परिस्थितीत येईल आणि तो येतोही शहनाई वाजवणाऱयांसोबत. त्या दोघांच्या भेटीच्या वेळी एका अँगलमधून दिसणारा ताजमहाल दाखवून दिग्दर्शकाला काहीतरी सांगायचं आहे. प्रत्येक नव्या दृश्याच्या सुरुवातीला दिसणारा ताजमहाल शुद्ध प्रेमाचं प्रतीक आहे. त्या ताजमहालच्या मागे असणारी प्रेमकथा आणि प्रेमाची ओढ इतिहासासारखी नाही. त्या प्रेमाच्या तीव्र ओढीने वर्तमान काळात मानसिक वेडेपणाचं रूप धारण केलेलं आहे ज्याला  वेडेपणाच म्हणता येईल.

अभिमन्यू तिचं रिशूवरचं प्रेम ओळखतो. तो सांगतो की तुम्ही दोघे या शहरातून निघून जा. मी सगळी सोय करतो. ज्या दिवशी राणीचं रिशूवरचं  प्रेम संपेल त्या दिवसापर्यंत मी तिची वाट पाहीन. कदाचित ती मला या आयुष्यात एकदा तरी भेटेल. प्रेमाचे अनेक त्रिकोण प्रेक्षकांनी पाहिलेले आहेत, पण प्रेमाचा हा त्रिकोण अतिशय विकसित आहे, जो आपल्या बायकोला तिच्या आधीच्या नवऱ्याकडे पाठवायला तयार आहे. तिने त्याला फसवलंय, पण तरी त्याचं तिच्यावर इतकं प्रेम आहे की, तो तिच्या प्राप्तीच्या आशेवर रिस्क घ्यायला तयार आहे.

ज्याप्रमाणे राणी दिनेश पंडित या लेखकाच्या कादंबऱया वाचून आपल्या आयुष्याचा जुगार खेळत असते, तिथे अभिमन्यूसुद्धा दिनेश पंडितांच्या कादंबऱ्यांचा चाहता आहे. तो ते वाचून डाव खेळत असतो. कथेतील हे वळण प्रेक्षकांकरिता धक्का देणारे ठरते. रिशूने पोलिसांना आठ वाजता यमुना नदीच्या या पुलावर तो सरेंडर होणार असल्याचं सांगितलं आहे. आठ वाजता एक ट्रेन येते. ती पुलाच्या मध्यभागी थांबते.  तिथे आणखी एक भलतेच नाटय घडते ते पडद्यावर पाहायला हवं. दिग्दर्शक पटकथा आणि त्यातील प्रेमाच्या गोष्टींमध्ये इतका गुंतला आहे की, रेल्वे ब्रिज, पादचारी पथ, सतत दिसणारा ताजमहाल, यमुना नदीतील नौकाविहार, आग्रा शहरातल्या गल्ल्या या सगळ्यांतून त्याने बोलण्याचा जास्त प्रयत्न केला आहे. तोच प्रयत्न अभिनयाबाबत केला असता तर हा चित्रपट अधिक परिणामकारक झाला असता.

(लेखक चित्रपट अभ्यासक आहेत.)