
महायुती सरकारमध्ये रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रीपदावरून सुरू असलेला तिढा अद्याप संपलेला नाही. त्यातच वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी वाशिम जिह्याच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी सोडली. यामुळे महायुतीमधील नाराजी नाटय़ाची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. महायुती सरकारमध्ये काही दिवसांपूर्वीच मंत्र्यांना पालकमंत्रीपदाच्या जबाबदारीचे वाटप करण्यात आले. यामध्ये स्वजिल्हा न मिळाल्याने शिंदे आणि अजितदादा गटाच्या मंत्र्यांमध्ये नाराजी असल्याचे दिसून आले होते. अजितदादा गटाचे मंत्री हसन मुश्रीफ यांचा मूळ जिल्हा कोल्हापूर आहे. मात्र, त्यांच्याकडे 625 किमी लांब असलेला वाशिम जिह्याच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आल्याने ते नाराज होते. अखेर मतदारसंघात वेळ देता येत नसल्याचे कारण देत मुश्रीफ यांनी वाशिम जिह्याच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी सोडली आहे.