हरियाणा स्टिलर्सचे विजेतेपदाचे स्वप्न साकार, पाटणा पायरेट्सचा 32-23 गुणफरकाने धुव्वा

गतवर्षी उपविजेतेपदावर समाधान मानावे लागलेल्या हरियाणा स्टिलर्सने अखेर प्रो कबड्डी लीगच्या 11 व्या हंगामात आपले विजेतेपदाचे स्वप्न साकार केले. जेतेपदाच्या लढतीत त्यांनी तीन वेळच्या विजेत्या पाटणा पायरेट्स संघाचा 32-23 असा 9 गुणांच्या फरकाने धुव्वा उडविला. महंमद रेझा शाडलुईचा भक्कम बचाव आणि मराठमोळा शिवम पठारे व विनय यांच्या यशस्वी चढायांच्या जोरावर हरियाणाने प्रथमच प्रो कबड्डीच्या झळाळत्या करंडकावर आपले नाव कोरले.

बालेवाडीत रंगलेल्या अंतिम सामन्यात हरियाणा स्टिलर्सच्या बचावफळीने पाटणा पायरेट्सच्या चढाईपटूंची कसोटी पाहिली. देवांक आणि अयान या चढाईपटूंवर पाटणा अवलंबून होते, पण आज त्यांचे दोन्ही शिलेदार हरियाणाचा बचाव भेदू शकले नाहीत. शिवाय त्यांची बचावफळी शिवम, विनयला रोखू शकले नाहीत. सामना एकवेळ एक-दोन गुणांच्या फरकाने सुरू होता. मध्यंतराला हरियाणा संघाकडे 15-12 अशी आघाडी होती, मात्र सामना संपण्यास सात मिनिटे असताना हरियाणा स्टिलर्स संघाने चढवलेला लोण सामन्याचा निकाल ठरविण्यास पुरा ठरला. लोणनंतर पाटणा संघाला केवळ पाच गुणांची कमाई करता आली. तुलनेत हरियाणानेदेखील पाच गुण मिळवून निर्विवाद वर्चस्वासह विजेतेपदाचे स्वप्न साकार केले. शाडलुईने बचावात मिळविलेले 7 गुण लीगच्या इतिहासात अंतिम फेरीतील सर्वाधिक ठरले. चढाईत शिवमने 9 आणि विनयने 7 गुण मिळवून आपली जबाबदारी चोख बजावली. तुलनेत पाटणाकडून गुरदीपच्या हायफाईव्हखेरीज सांगण्यासारखे काहीच घडले नाही. सर्वाधिक चढाईचे गुण मिळविणाऱया देवांकने एका हंगामातील गुणांचे त्रिशतक गाठले, मात्र त्याला पाच गुणांच्या पुढे जाता आले नाही. अयानही केवळ 3 गुण मिळवू शकला. येथेच पाटणाचे अपयश स्पष्ट होते. स्पर्धेतील विजेत्या हरियाणा स्टिलर्स संघाला करंडक व 3 कोटी रुपये, तर उपविजेत्या पाटणा पायरेट्स संघाला करंडक व 1.8 कोटी रुपये अशी पारितोषिके देण्यात आली.