हरयाणात भाजपचा माईंड गेम! मतमोजणीवरून काँग्रेस नेते जयराम रमेश यांचा थेट निवडणूक आयोगावर निशाणा

हरयाणा विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू आहे. अद्याप पूर्ण निकाल लागलेले नाहीत. अशातच हरयाणातील मतमोजणीवरून काँग्रेसने थेट निवडणूक आयोगावरच गंभीर आरोप केला आहे. काँग्रेसने मतमोजणीच्या मुद्द्यावरून निवडणूक आयोगाकडे लेखी तक्रार केली आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश आणि सुप्रिया श्रीनेत यांनी निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले आहेत.

निवडणूक आयोग मतमोजणीची ताजी आकडेवारी अपडेट करत नसल्यामुळेच भाजप सध्या आघाडीवर दिसत आहे. हा भाजपचा माईंड गेम आहे. त्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांनी निराश होऊ नये, असे जयराम रमेश यांनी म्हटले आहे.

काय म्हणाले जयराम रमेश?

आम्ही निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. आम्ही आता त्यांच्या उत्तराची वाट पाहतोय. 9-10 जागांवर आतापर्यंत मतमोजणीच्या 11 ते 12 फेऱ्या पार पडल्या आहेत. पण निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर चौथ्या आणि पाचव्या फेरीचे निकाल दाखवले जात आहेत. त्यामुळे भाजप आघाडीवर दिसत आहे. हा प्रशासनावर दबाव आणण्याचा प्रकार आहे. लोकसभा निवडणुकीवेळीही हाच प्रकार घडला होता. निवडणूक आयोगाने निष्पक्षपणे काम केले पाहिजे. स्थानिक यंत्रणांवर निवडणूक आयोगाने दबाव आणणे योग्य नाही. त्यामुळे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी निराश होऊ नये. काँग्रेस कार्यकर्त्यांनी तीन ते साडेतीन वाजेपर्यंत मतमोजणी केंद्रांवर थांबून राहावे. खेळ अजून संपलेला नाही. भाजप मनोवैज्ञानिक खेळ खेळत आहे. हा भाजपचा माईंड गेम आहे, असा आरोप जयराम रमेश यांनी केला आहे.