मोदीजी, सांगा त्या सौगातचे काय झाले? हर्षवर्धन सपकाळ यांचा सवाल

गुजरातमधील जातीय दंगलीतून, हिंदू-मुस्लीम दंग्यातून स्वतःचे नेतृत्व पुढे आणणारा माणूस जर आता सौगातसारख्या गोष्टी करत असेल तर दरवर्षी दोन कोटी बेरोजगारांना नोकरी देणार, शेतकऱ्यांच्या शेतमालाला दीडपट भाव देणार, प्रत्येकाच्या खात्यात 15 लाख जमा करणार, पेट्रोल 40 रुपये तर डिझेल 35 रुपये करू, अशा घोषणांच्या सौगातीचे मोदीजी काय झाले, असा सवाल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे.

पंतप्रधानांच्यावतीने ईदनिमित्ताने मुस्लीम कुटुंबांच्या घरी जाऊन शेवया, खजूर व इतर सुक्या मेव्याचा समावेश असलेल्या भेटवस्तूंची सौगात वाटली जाणार आहे. या ‘सौगात-ए-मोदी’वर सपकाळ यांनी सडकून टीका केली आहे. हिंदू-मुस्लीम दंग्यातून पुढे आलेले मोदीजींना देशवासीयांबरोबर केलेल्या विविध घोषणांच्या सौगातीचा विसर पडला आहे. हे म्हणजे ‘सौ चूहे खाकर, बिल्ली हज को चली’ अशा म्हणीप्रमाणे मोदीजी यांचे वागणे आहे. मात्र मोदीजी सोयीस्करपणे त्यांनी केलेल्या घोषणांची सौगात विसरले असले तरी या सौगातीची संपूर्ण देश वाट पाहत आहे, असे ते म्हणाले.