
राज्यातील शेतकऱयांची मते घेऊन महायुतीने सत्ता मिळवली. पण उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एका कार्यक्रमात बोलताना कर्जमाफी मिळू शकणार नाही, असे मुजोरपणे विधान केले. त्याचा खरपूस समाचार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आज घेतला. ‘दादा, क्या हुआ तेरा वादा’ अशा शब्दांत त्यांनी आपला संताप व्यक्त केला. जनतेने बहुमत देऊनही सत्ताधारी आता राक्षसाप्रमाणे वागू लागले आहेत, असेही सपकाळ यांनी सुनावले.
उल्हासनगरातील पक्ष बांधणीसाठी दौऱयावर आलेल्या सपकाळ यांनी पदाधिकाऱयांचा मेळावा घेतला. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, ट्रिपल इंजिन सरकारचे नेते मोदी आणि अमित शहा हे सतत राज्य सरकारचे गुणगान गात असतात. त्यामुळे अजित पवार यांनी आता दिल्लीला जाऊन पेंद्र सरकारकडून शेतकऱयांसाठी विशेष पॅकेज घेऊन यावे. नोटबंदीवरही प्रदेशाध्यक्षांनी सडकून टीका केली.