इतिहासाला काळीमा फासणाऱ्यांची छत्रपतींच्या घराण्याकडूनच पाठराखण, उदयनराजेंवर हर्षवर्धन सपकाळांची तोफ

मागील काही दिवसांपासून छत्रपतींच्या घराण्यातील खासदार उदयनराजे भोसले आणि मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले हे ज्यांनी इतिहासाला काळीमा फासण्याचे काम करणाऱ्यांची पाठराखण करत आहेत. पहिल्या शाळेसंदर्भात खासदार उदयनराजेंनी केलेले वक्तव्य दुर्दैवी आणि खोडसाळपणाचे आहे. ते सोलापूरकर व कोरटकरांवर काहीच बोलत नाहीत, हेही दुर्दैवी आहे, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी पत्रकार परिषदेत केली.

समता भूमी येथे माध्यमांशी बोलताना खासदार उदयनराजे यांनी थोरले प्रतापसिंह महाराज यांनी सर्वप्रथम स्त्री शिक्षणासाठी शाळा सुरू केली, त्याचे महात्मा फुले यांच्याकडून अनुकरण करण्यात आल्याचे विधान केले. यावर सपकाळ म्हणाले, मुलींची पहिली शाळा कुणी सुरू केली, याला इतिहास साक्षीदार आहे. उदयनराजे यांचे वक्तव्य दुर्दैवी व खोडसाळपणाचे आहे. छत्रपतींच्या घराण्यातील लोक इतिहासाला काळीमा फासणाऱ्यांची पाठराखण करत आहेत. सरकार या माध्यमातून इतिहास पुसण्याचे काम करत आहेत.

छत्रपती शिवाजी महाराज यांची समाधी आणि त्यांचा इतिहास लोकांपर्यंत पोहचण्यात महात्मा फुले यांचे योगदान मोठे आहे. फुले दाम्पत्य ज्या प्रवृत्तींच्या विरोधात लढले, त्या प्रवृत्तींनी आज पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. चातुर्वर्ण्य व्यवस्था पुन्हा लागू करण्याचा डाव आहे. संविधानातील समता, बंधुता व सामाजिक न्याय या मुल्ल्यांना बाजूला सारण्याचा प्रयत्न सत्ताधाऱ्यांकडून होत आहे. फुले दाम्पत्याने मुलींची पहिला शाळा काढली, त्यावेळी सावित्रीबाई फुलेंवर दगड फेकणारे, शेण फेकणारे विदेशातून आले नव्हते. महिला शिकली तर धर्म बुडेल, या विचाराच्या लोकांनीच त्यांना छळले. आता फुले चित्रपटातून तो भाग वगळावा, असे सेन्सॉर बोर्ड सांगत आहे, ही लपवाछपवी कशासाठी? मंत्री चंद्रकांत पाटील आज फुले वाड्यावर बोलताना म्हणाले की, पूर्वी तसे होत होते; पण आता होत नाही. संविधानामुळे ते होत नाही. पण चंद्रकांत पाटील यांच्या पक्षाला हे मान्य आहे का? भाजपासाठी गोळवलकरांचे बंच ऑफ थॉट हे बायबल आहे, त्यात महिला शिक्षणाला थारा नाही. चातुर्वर्याबरोबर पाचवा वर्ण महिला सांगितलेला असून, महिलांना अतिशुद्र म्हटले आहे ते चंद्रकांत पाटील यांना मान्य आहे का? असा प्रश्न सपकाळ यांनी उपस्थित केला.