
दोन वर्षाची शिक्षा ठोठावल्यानंतर माणिकराव कोकाटे यांची आमदारकी रद्द करावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे. महाराष्ट्र एसटी कामगार काँग्रेसने आयोजित केलेल्या रक्तदान शिबिराला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी भेट दिली. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी ही मागणी केली आहे.
माध्यमांशी संवाद साधताना हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, ”रेल्वे अपघाताची नैतिक जबाबदारी घेऊन लाल बहादूर शास्त्री यांनी राजीनामा देऊन आदर्श घालून दिला आहे. पण आत्ताच्या सत्ताधारी भाजपाने नैतिकतेला हरताळ फासला आहे. कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांना फसवणूक प्रकरणी न्यायालयाने दोन वर्षाची शिक्षा ठोठावल्यानंतर त्यांनी तात्काळ राजीनामा द्यायला हवा होता किंवा सरकारने त्यांचा राजीनामा घ्यायला हवा होता. पण तसे झाले नाही. आता महामहिम राज्यपाल यांनीच याप्रकरणात लक्ष घालून माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा घ्यावा आणि त्यांची आमदारकी रद्द करावी.”