
नागपुरात झालेल्या हिंसाचारावेळी मुख्यमंत्री पोलिसांना फोन करत होते; पण पोलिसांनी फोन उचलले नाहीत, असे भाजपा आमदार सांगत होते. यातून दंगलीचे प्रायोजक कोण होते हे वेगळे सांगण्याची गरज नाही. सत्ता टिकण्यासाठी राज्यात दंगली घडवल्या जात आहेत. या दंगलींच्या आडून महाराष्ट्र लुटून उद्योगपतींना जमिनी दिल्या जात आहेत, अशा शब्दांत काँग्रेस प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी भाजपवर हल्ला चढवला.
नागपूर शहरात सामाजिक सौहार्द व शांतता नांदावी यासाठी काँग्रेसने आज सद्भावना शांती मार्च काढला. आजच्या पदयात्रेत दीक्षाभूमी, ताजुद्दीन बाबा व टेकडी गणेश मंदिरात दर्शन घेऊन सद्भावनेचे साकडे घालण्यात आले. या मोर्चात प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, प्रभारी रमेश चेन्नीथला, काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार, गोव्याचे प्रभारी माणिकराव ठाकरे यांच्यासह काँग्रेस कार्यकर्ते मोठय़ा संख्येने सहभागी झाले होते.
सत्तेसाठी काही लोक भावाभावात, जातीपातीत भांडणे लावत आहेत. अशावेळी आपल्याला एकजुटतेने सद्भावनेच्या मार्गाने जावे लागणार आहे. संविधानाचा, शिव, शाहू, फुले, आंबेडकरांचा विचार पुढे घेऊन जायचा आहे आणि राहुल गांधी यांचे ‘मोहब्बत की दुकान’ उघडायचे आहे, असे सपकाळ म्हणाले.
काँग्रेस ईडी, सीबीआय कारवाईला घाबरत नाही
भाजपा सरकारच्या विरोधात निर्भीडपणे उभे राहणाऱया काँग्रेसच्या देशभरातील नेत्यांवर मोदी सरकार कारवाई करत आहे. काँग्रेस नेत्यांवर खोटे गुन्हे दाखल केले जात आहेत. काँग्रेस नेत्या सोनिया गांधी व खासदार राहुल गांधी यांच्यावर राजकीय सूडबुद्धीने ईडीची कारवाई करण्यात आली आहे. काँग्रेस पक्ष ईडी, सीबीआयच्या कारवायांना घाबरत नाही, असे रमेश चेन्नीथला यांनी सांगितले.