
क्रांतीसूर्य महात्मा जोतीबा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा वसा व वारसा आपल्याला पुढे न्यायचा आहे. परंतु फुले दाम्पत्य ज्या प्रवृत्तींच्या विरोधात लढले त्या प्रवृत्तींनी आज पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. चातुर्वर्ण्य व्यवस्था पुन्हा लागू करण्याचा डाव आहे, असा हल्लाबोल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला.
संविधानातील समता, बंधुता व सामाजिक न्याय या मुल्ल्यांना बाजूला सारण्याचा प्रयत्न सत्ताधाऱ्यांकडून होत आहे. फुले दाम्पत्याने मुलींची पहिला शाळा काढली त्यावेळी सावित्रीबाई फुलेंवर दगड फेकणारे, शेण फेकणारे विदेशातून आले नव्हते, महिला शिकली तर धर्म बुडेल या विचाराच्या लोकांनीच त्यांना छळले. आता फुले चित्रपटातून तो भाग वगळावा असे सेन्सॉर बोर्ड सांगत आहे, ही लपवाछपवी कशासाठी? असा सवालही त्यांनी केला.
मंत्री चंद्रकांत पाटील आज फुले वाड्यावर बोलताना म्हणाले की पूर्वी तसे होत होते पण आता होत नाही. संविधानामुळे ते होत नाही. पण चंद्रकांत पाटील यांच्या पक्षाला हे मान्य आहे का? भाजपासाठी गोळवलकरांचे ‘बंच ऑफ थॉट’ हे बायबल आहे, त्यात महिला शिक्षणाला थारा नाही. चातुर्वर्ण्याबरोबर पाचवा वर्ण महिला सांगितलेला असून महिलांना अति शुद्र म्हटले आहे ते चंद्रकांत पाटील यांना मान्य आहे का? असा प्रश्न सपकाळ यांनी उपस्थित केला.
मी कधीही उपोषण करायला मोकळा! छगन भुजबळ यांची नाराजी अजूनही कायम
दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून SIT चौकशी करा!
पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने पैशासाठी तनिषा भिसे या भगिनीला उपचार नाकारल्याने तिचा मृत्यू झाला. हा रुग्णालयाने घेतलेला बळी आहे. या धर्मादाय रुग्णालयाने अटी व शर्थींचा भंग केलेला आहे पण कारवाई करताना सरकार वेळकाढूपणा करत आहे. मंगेशकर रुग्णालयातील दोषींना वाचवण्याचा प्रयत्न केला जात आहे. या रुग्णालयाचे संचालक मंडळ बरखास्त करून सरकारने दवाखाना ताब्यात घ्यावा. डॉ. केळकर व रुग्णालयाच्या विश्वस्त मंडळावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा आणि संपूर्ण प्रकरणाची निवृत्त न्यायाधिशांमार्फत एसआयटी चौकशी करावी, अशी मागणी सपकाळ यांनी केली आहे.
हर्षवर्धन सपकाळ यांनी शुक्रवारी पुण्यात महात्मा ज्योतीबा फुले जयंतीनिमित्त फुलेवाड्यात जाऊन अभिवादन केले व त्यानंतर भिसे कुटुंबाची सांत्वनपर भेट घेतली, त्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना ते पुढे म्हणाले की, लता मंगेशकर यांच्या जादुई आवाजाने सर्वांना मंत्रमुग्ध केले पण आता, कोण होतास तू काय झालस तू, अशी अवस्था झाली आहे. जी घटना झाली ती अत्यंत वाईट आहे. एका गर्भवती महिलेला पैशासाठी साडेपाच तास ताटकळत ठेवून उपचार नाकारले. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी मंगेशकर रुग्णालयातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घ्यावे. मयत भिसे यांच्या पतीचा व डॉ. केळकर यांचा सीडीआर ताब्यात घ्यावा. या घटनेनंतर तात्काळ गुन्हे दाखल करायला हवे होते पण सरकार वेळकाढूपणा करत आहे, असे सपकाळ म्हणाले.
दीनानाथ मंगशेकर रुग्णालयात जो प्रकार झाला तो अमानुष असून माणुसकीला काळीमा फासणारा आहे. एवढी मोठी घटना होऊन रुग्णालय प्रशासन व डॉक्टरांना जराही शरम वाटत नाही. प्रशासन हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करत आहे का असा संशय येत आहे. सर्व घटनाक्रम विषण्ण करणारा आहे. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना जर असा प्रकार घडत असेल तर अत्यंत दुखःद आहे. या प्रकरणात डॉ. केळकर असल्याचे दिसते, प्रशासनाने त्यांना बडतर्फ करावे त्यांच्यावर कटात सहभागी असल्याचा गुन्हा दाखल करावा, डॉ. केळकर यांनी पहिला फोन उचलला पण नंतर एकही फोन उचलला नाही. जबाबदार माणूस असे कसे वागू शकतो. डॉ. केळकर यांचा सीडीआर तपासला पाहिजे. सरकार हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करत आहे असे वाटते. झालेली घटना दुर्दैवी आहे, आज भिसे परिवाराला आधार देण्यासाठी त्यांची सांत्वनपर भेट घेतली असे सपकाळ म्हणाले.