
महायुती सरकारच्या काळात राज्यातील कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न अत्यंत गंभीर झाला आहे. बीड जिह्यामध्ये तर कायद्याचे नाही, गुंडाराज आले आहे, अशी परिस्थती आहे. पोलीस आणि गृह विभाग काय करत आहे, असा संतप्त सवाल काँग्रेस प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केला आहे. फडणवीस यांनी आता तरी गृह खात्याचा मोह सोडून राज्याला पूर्ण वेळ गृह मंत्री द्यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.
महाराष्ट्रात कायद्याचा कुणाला धाक राहिलेला नाही. सरकारी आशीर्वादाने वाळू, जमीन, पवनचक्की, मटका, दारू, कोळसा माफिया तयार झाले आहेत. ते दररोज पोलिसांना आव्हान देत आहेत. खून, दरोडे बलात्काराच्या घटना दररोज घडत आहेत. केंद्रीय मंत्र्यांच्या मुलीची छेड काढूनही आरोपींना अटक होत नाही. त्यासाठी केंद्रीय मंत्र्यांना पोलीस स्टेशनमध्ये ठिय्या आंदोलन करावे लागते ही राज्याला शरम आणणारी बाब आहे, असे सपकाळ म्हणाले.
सत्ताधाऱ्यांच्या आशीर्वादाने बीडमध्ये आका, खोक्याचा उदय
सत्ताधारी पक्षाचे आमदारच बीडचा बिहार, तालिबान झाला आहे असे सांगत आहेत. बीडमध्ये आका, खोक्या सत्ताधाऱ्यांच्या आशीर्वादानेच उदयास आले आहेत. बीड जिह्यातील गुन्हेगारांची मजाल इतकी वाढली आहे की, आता बीडच्या जेलमध्येच कराड आणि गित्ते या दोन टोळ्यांमध्ये गँगवार सुरू झाले आहे. बीडचे जेलही सुरक्षित नाही ही चिंतेची बाब आहे, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.