प्लेलिस्ट – भारदस्त सुरांची किमया

>>हर्षवर्धन दातार

सॅक्सोफोन वाद्याच्या अष्टपैलू वैशिष्टय़ांमुळे मनोहारी सिंग, सुरेश यादव, श्यामराज, जॉर्ज बाप्तीस्ता यांसारख्या दिग्गज वादकांनी या बहुआयामी वाद्याला प्रतिष्ठेची जागा मिळवून दिली. सोबत सलील चौधरी, एसडी बर्मन, शंकर-जयकिशन, कल्याणजी-आनंदजी, ओपी नय्यर, लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांच्यासारख्या संगीतकारांनीही सॅक्सोफोनच्या साथीने गाण्याचे संगीत वेगळय़ा पातळीवर नेले. यामुळेच आजही अनेक गाणी त्यात वाजलेल्या सॅक्सोफोनमुळे श्रोत्यांच्या लक्षात आहेत.

आपल्या डोळ्यांपुढे एक दृश्य आणा. एक डोंगर चढत आपण त्याच्या शिखरावर पोहोचतो आणि आपल्या नजरेसमोर अचानक दूर क्षितिजापर्यंत पसरलेली शेते, मोकळे मैदान, आकाश असा भव्य आसमंत आपल्या दृष्टिक्षेपात येतो. आपण निसर्गाच्या त्या भव्य आविष्काराने दिपून जातो. अगदी नेमका तोच परिणाम सॅक्सोफोनच्या विलंबित सलग आणि कंपहीन वाजलेल्या भारदस्त सुरांतून आपल्याला जाणवतो. ही किमया आहे सॅक्सोफोनची.

गेल्या भागात आपण सचिन देव बर्मन यांची सॅक्सोफोन आधारित गाणी बघितली. आपल्या संगीतात ब्रास सेक्शनचा वापर करण्याकरिता प्रसिद्ध त्यांचे सुपुत्र राहुल देव बर्मन यांनीही संयोजक आणि वादक मनोहारी सिंग यांच्यामार्फत सॅक्सोफोनचा भरपूर उपयोग आपल्या गाण्यात केला. बीयरच्या बाटल्या फुंकून सुरुवातीचं संगीत असलेलं ‘शोले’ (1975) यातलं ‘मेहबूबा मेहबूबा’ हे संगीतकार-गायक राहुल देव बर्मन यांनी आपल्या खर्जात गायलेलं अतिशय लोकप्रिय गाणं यात इराणी संतूरसोबत अंतऱयापूर्वी सॅक्सोफोन वाजवला आहे स्वत मनोहारी सिंगनी. सुनील दत्त सुपुत्र संजय यांच्या ‘रॉकी’ (1980) या पदार्पणाच्या चित्रपटात ‘क्या यही प्यार है’ या अतिशय सुरेल गाण्यातसुद्धा पंचमनी प्रत्येक अंतऱयापूर्वी सुरांच्या वेगवेळ्या पट्टीत सॅक्सोफोनचा सुंदर उपयोग केला आहे. विजय आनंदच्या तुफान गाजलेल्या ‘तिसरी मंझिल’ (1966)मध्ये शम्मी कपूर हा क्लबच्या बँडमध्ये वाजवतो.

अलौकिक बुद्धी असलेले, बहुआयामी आणि एक सृजनशील ाढांतिकारी संगीतकार अशी ओळख असलेले सलील चौधरी यांनीही बासरीची, क्लॅरिनेट आणि सॅक्सोफोन या फुंकवाद्यांचा सुंदर उपयोग आपल्या रचनांमध्ये केला. ‘छोटी सी बात’ (1976) मध्ये ‘ये दिन क्या आये’ या मुकेशने गायलेल्या फ्लॅशबॅक गाण्यात सतार आणि सॅक्सोफोन या वाद्यातून मेलडी आणि हार्मोनीचा सुरेल संगम साधला आहे. अतिशय कठीण चाल म्हणून किशोर कुमारने आधी नकार दिलेल्या, मात्र सलिलदांनी पाठपुरावा केल्यामुळे नंतर उत्कृष्ट गायकीने सर्वाना आश्चर्यचकित केले ते गाणे ‘अन्नदाता’ (1972) मधले ‘गुजर जाये दिन’ सुरांच्या उतारचढावामुळे हे गाणे रोलर कोस्टरचा अनुभव देते. सुरूवातीलाच सॅक्सोफोनचे सूर अनिल धवनच्या सायकल प्रवासाचा मूड तयार करतात. पुढे अंतऱयापूर्वी पुन्हा सॅक्सोफोनचे वरच्या पट्टीतले सूर गाण्याला समेवर आणतात.

मनोहरी सिंगना मुंबईत आणण्याचं श्रेय सलिलदांचंच. ‘जा रे जा रे उड जा रे पंछी’ ह्या ‘माया’ (1961) मधील गाण्यात लताजींच्या ‘मै बीना उठा ना सकी, तेरे संग गा ना सकी’ या शब्दांना सॅक्सोफोनने अंतऱयापूर्वी विरहाची किनार धरली आहे. सुरूवातीला सलिल चौधरी आणि जयदेव हे मेलडी आणि लोकसंगीतप्रचुर गाण्यांकरिता ओळखले जात. त्यांनी सत्तरच्या दशकात बदलत्या संगीताला धरून आपल्या संगीतात अधिक वाद्यमेळ आणि समकालीनता आणली. ‘आलिंगन’ (1974) या ‘बी ग्रेड’ चित्रपटात मन्नाडेनी गायलेल्या ‘प्यास थी, फिर भी तकाजा न किया’ या जयदेव यांच्या प्रकृतीच्या विपरीत असा वाद्यमेळ असलेल्या गाण्यात बॉन्गो, व्हायोलिनबरोबर सॅक्सोफोनचा उपयोग केला आहे.

व्यापक आणि प्रशस्त वाद्यमेळाकरिता प्रसिद्ध संगीतकार जोडी शंकर-जयकिशन जोडीनंही ट्रम्पेट आणि सॅक्सोफोनचा समर्पक उपयोग केला. ‘ब्रह्मचारी’ (1968) यात ‘आज कल तेरे मेरे प्यार के चर्चे’ या धमाल नृत्यगीतात नृत्याला साजेसे आनंदी आणि उत्साही सूर सॅक्सोफोननी दिले आहेत. उलट ‘प्रोफेसर’ (1962) यातील ‘आवाज देके हमे तुम बुलाओ’ या काहीशा ‘हॉन्टिंग’ गाण्यात सॅक्सोफोनचे साद घालणारे सूर आपण ऐकतो. सलग आणि मोकळ्या सॅक्सोफोन वादनाची खरी करामत आपल्याला ‘तुमसे अच्छा कौन है’(1966) यातील ‘जनम जनम का साथ है’ आणि ‘आरजू’ (1965) मधील ‘बेदर्दी बालमा तुझको मेरा मन याद करता है’ या गाण्यात दिसते. पहिल्या गाण्यात शम्मी कपूर बबिताची मनधरणी करतो तर दुसऱया गाण्यात साधनाचा विरह आपल्याला दुःखी करतो. या भावनांचा कल्लोळ आपल्यापर्यंत पोचतो, अर्थात मनोहारी सिंग यांच्या सॅक्सोफोन वादनामुळे. ‘जंगली’ (1961) चित्रपटाकरिता मनोहारी सिंग यांनी शंकर-जयकिशनबरोबर प्रथम काम केलं. शीर्षक संगीतात त्यांनी ‘चाहे कोई मुझे जंगली कहे’चा छोटासा भाग सॅक्सोफोनवर वाजवला आहे.

उदास आणि दुःखी गाण्यांच्या पंक्तीत कल्याणजी-आनंदजी यांनीही सॅक्सोफोनचा योग्य वापर केला. ‘मर्यादा’ (1971) यात ‘जुबां से दर्दभरी दास्तान चली आई’ यात पडद्यावर राजेश खन्नाला आवाज दिला आहे मुकेशनी आणि सोबत अंतऱयापूर्वी आहे सॅक्सोफोनचे प्रदीर्घ सूर. पुढेच अशाच प्रकृतीच्या ‘इमानदार’ (1987) चित्रपटातील ‘और इस दिल में क्या रखा है’ यात सुरेश वाडकर यांच्याबरोबर दुःखी सूर लावले आहेत सॅक्सोफोननी. ‘जॉनी मेरा नाम’ (1970) या प्रेक्षणीय लोकप्रिय चित्रपटात ‘हुस्न के लाखो रंग’ हे पद्मा खन्ना आणि प्रेमनाथ जोडीवर चित्रित एक अतिशय मादक आणि प्रक्षोभक नृत्यगीत होते. मात्र अभिरुचीला धरून आणि संयत चित्रीकरण केलेल्या या गाण्याची सुरूवात सुरेश यादव यांनी वाजवलेल्या सॅक्सोफोननी होते. प्रदीर्घ आणि सलग सॅक्सोफोन वाजलेल्या अजून दोन गाण्यांची उदाहरणे देता येतील, ज्यांना आपण ‘आयसिंग ऑन द केक’ म्हणू शकतो आणि ती म्हणजे ओपी नय्यर-रफी यांचं ‘काश्मीर की कली’ (1964) मधलं ‘है दुनिया उसी की’ आणि लक्ष्मी-प्यारे-किशोरकुमार यांचं ‘अमीर गरीब’(1974) मधलं ‘लेडीज अँड जेंटलमेन’ ही दोन गाणी. दोन्ही गाण्यात सॅक्सोफोनच्या सुरांची बरसात आहे, गायकांबरोबर अक्षरश जुगलबंदी करतात वादक, अर्थात मनोहारी सिंग.

असंख्य गाण्यात सॅक्सोफोननी वेगळीच रंगत आणली असली तरी दक्षिण भारतातले एक हरहुन्नरी संगीतकार इलायराजांनी सॅक्सोफोनचा अफलातून वापर ‘चीनी कम’ (2007) चित्रपटात त्याच्या कथावस्तू संगीतात वापर केला. पाश्चिमात्य संगीतकाराने ही चीज तयार केली आहे की काय असे ऐकताना वाटते. सॅक्सोफोन वाद्याच्या अष्टपैलुत्वामुळे मनोहारी सिंग, सुरेश यादव, श्यामराज, जॉर्ज बाप्तीस्ता यांसारख्या दिग्ग्ज वादकांनी या बहुआयामी वाद्याला प्रतिष्ठेची जागा मिळवून दिली. आजही अनेक गाणी त्यात वाजलेल्या सॅक्सोफोनमुळे श्रोत्यांच्या लक्षात आहेत.

(लेखक संगीत अभ्यासक आहेत.)