महिलांच्या आयुष्यात बदल घडवायचा आहे!देशात दुसरी आलेल्या हर्षिता गोयलचे लक्ष्य

यूपीएससी परीक्षेत देशात दुसरा क्रमांक पटकवलेल्या हरयाणाच्या हर्षिता गोयलने निकालानंतर आपल्या भावना व्यक्त केल्या. महिलांच्या आयुष्यात बदल घडवण्यासाठी मी आयएएस अधिकारी झाले आहे. ज्या दिवसापासून सेवेत रुजू होईल, त्या दिवसापासून मी महिलांच्या कल्याणासाठी काम करण्याचा प्रयत्न करेल, असे हर्षिताने म्हटले आहे. आमच्या पुटुंबातील मी पहिली महिला आहे. जिने यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण केली आहे. मला शिक्षणासाठी पुटुंबातून खूप पाठिंबा मिळाला. माझी आई आता हयात नाही, परंतु वडिलांनी आई आणि वडील असे दोघांचे प्रेम दिले. प्रत्येक वाटेत मला वडिलांची साथ मिळत गेली. वडिलांनी एकटय़ाने माझा छोटा भाऊ, माझे आजी-आजोबा यांची काळजी घेण्यासोबत माझ्या शिक्षणाकडे विशेष लक्ष दिले. पुटुंबासोबत मला माझ्या मित्र-मैत्रिणींचीही खूप मदत मिळाली. हर्षिता एक चार्टर्ड अकाऊंटेंट आहे, तर तिचे वडील गुजरातमधील एका खासगी पंपनीत काम करतात. वडील नोकरीनिमित्त गुजरातमध्ये असल्याने हर्षिताचे पुटुंब गुजरातमध्ये वास्तव्यास आहे.

नियमित अभ्यास महत्त्वाचा

यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण करायची असेल तर विद्यार्थ्यांनी नियमित अभ्यास करावा. दररोज किती तास अभ्यास करायचा, याचे वेळापत्रक करणे गरजेचे आहे. यूपीएससीची तयारी करताना जर विद्यार्थ्याला अभ्यास करावासा वाटला नाही तर थोडा ब्रेक घेणे आवश्यक आहे, परंतु छोटय़ा ब्रेकनंतर तितक्याच वेगाने अभ्यास करणे गरजेचे आहे. कधी कधी इन्स्टाग्रामचा वापर केला, परंतु तो खूपच मर्यादित होता. सोशल मीडियाचा वापर करताना त्या गोष्टींना फॉलो करायला हवे. ज्यामुळे आपल्याला नवीन माहिती मिळेल आणि फायदा होईल, असेही हर्षिता गोयलने म्हटले आहे.