दिल्लीचा नव्या दमाचा अष्टपैलू वेगवान गोलंदाज हर्षित राणा याला टीम इंडियात वाइल्ड कार्ड एण्ट्री मिळाली आहे. रणजी ट्रॉफी सोडून त्याला टीम इंडियात पाचारण करण्यात आले. त्यामुळे मुंबईत शुक्रवारपासून सुरू होणाऱया हिंदुस्थान-न्यूझीलंडदरम्यान होणाऱया तिसऱया कसोटी क्रिकेट सामन्यात हर्षितच्या खेळण्याची शक्यता बळावली आहे.
आसामविरुद्धच्या रणजी सामन्यात हर्षित राणाने अर्धशतक ठोकून पाच विकेटही टिपले होते. या अष्टपैलू कामगिरीचे बक्षीस आपल्याला इतक्या लवकर मिळेल, असे हर्षितलाही वाटले नसेल. एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, हर्षितला न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱया कसोटी सामन्यासाठी टीम इंडियात सामील होण्यास सांगितले आहे. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर होणाऱया या सामन्यातून हर्षित आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्येही पदार्पण करू शकतो, असे मानले जात आहे. बॉर्डर-गावसकर मालिकेसाठी निवडलेल्या हिंदुस्थानी संघातही या युवा वेगवान गोलंदाजाचा समावेश करण्यात आला आहे.
हर्षितसाठी कोणाला बाकावर बसविणार?
हर्षित राणा हा अष्टपैलू वेगवान गोलंदाज आहे. त्यामुळे कदाचित वेगवान गोलंदाज आकाशदीपच्या जागेवर त्याला खेळविण्यात येऊ शकते. याचबरोबर मुंबईतील वानखेडे स्टेडियमची खेळपट्टी वेगवान गोलंदाजीसाठी पोषक असल्याने तिसऱया कसोटीत दोनच फिरकीपटूंसह टीम इंडिया मैदानावर उतरू शकते. अशा परिस्थितीत पुणे कसोटीत छाप सोडणाऱया वॉशिंग्टन सुंदरला संघाबाहेर करण्याचे धाडस ‘बीसीसीआय’ची संघव्यवस्थापन समिती करणार नाही. त्यामुळे हर्षितसाठी रविचंद्रन अश्विन किंवा रवींद्र जाडेजा या अनुभवी अष्टपैलू फिरकीवीरांपैकी एकाला बाकावर बसावे लागण्याची शक्यता अधिक आहे.