प्लेलिस्ट – सुन जा दिल की दास्ताँ…

>> हर्षवर्धन दातार

‘LISTEN’ आणि ‘SILENT’ या दोन इंग्रजी शब्दांकडे आपण बारकाईने बघितलं तर आपल्या असं लक्षात येईल की, सगळी अक्षरं तीच आहेत, फक्त त्यांची रचना वेगळी आहे. मात्र अतिशय खोल आशय आहे. वत्तेपणा कमी आणि श्रोत्याची भूमिका अधिक या उक्ती आणि कृतीतून आपले आणि समाजाचे जीवन अधिक समृद्ध होणे क्रमप्राप्तच आहे. कारण अंतत ज्ञान बोलके असते. मात्र शहाणपण नेहमी श्रवण करते हेच त्रिकालाबाधित सत्य आहे.

‘जगातल्या यशस्वी व्यक्तींची एक ओळख म्हणजे ते बोलण्यापेक्षा ऐकण्यावर भर देतात, समोरच्याला आदर देण्याचा मार्ग हा ऐकण्यातून व्यक्त होतो व संवादाच्या कलेमध्ये ऐकण्याला तसेच ऐकून घेण्याला प्राधान्य आहे.’

बोलणे आणि ऐकणे या विषयावर वरील वाक्यांचा आशय लक्षात घेणं महत्त्वाचे आहे. ‘LISTEN’ आणि ‘SILENT’ या दोन इंग्रजी शब्दांकडे आपण बारकाईने बघितलं तर आपल्या असं लक्षात येईल की, सगळी अक्षरं तीच आहेत, फक्त त्यांची रचना वेगळी आहे. मात्र अतिशय खोल आशय आहे. सुप्रसिद्ध संगीतकार व महाराष्ट्राचे संगीत-दैवत सुधीर फडके ‘बाबूजीं’नी एका मुलाखतीत सांगितलं होतं की, त्यांनी आपली सुरुवातीची काही वर्षं आपले गुरू आणि इतर दिग्गज गायकांना फक्त ‘ऐकण्यात’ गुंतवली. त्यामुळे त्यांची संगीताची समज अधिक परिपक्व झाली. नजर टाकू या अजून काही सूचक ‘ऐकीव’ गाण्यांवर.

कविराज शैलेंद्रनी आपल्या सुरुवातीच्या खडतर दिवसांच्या आठवणी ‘दिल का हाल सुने दिलवाला’ या ‘श्री 420’मधील (1955) गाण्यातून प्रभावीपणे मांडल्या आहेत. पडद्यावर व्यक्त झाले होते शैलेंद्रचे जिवलग मित्र राज कपूर. संदेश हाच की, समदुःखी माणसं एकमेकांचं दुःख जाणतात आणि त्यातून दुःख हलकं होतं. श्रेष्ठ गीतकार आनंद बक्षींनी तर ‘राजपूत’मधील (1980) ‘कहानियाँ सुनाती है पवन आती जाती’ या संथ, सुंदर गाण्यात वाऱ्याला कथाकाराची भूमिका दिली, तर पणती आणि ज्योत त्या गोष्टीतले नायक-नायिका. ‘आये दिन बहार के’मध्ये (1966) एक अतिशय सुरेल, शास्त्रीय बाज असलेले ‘सुनो सजना पपीहे ने’ ही आनंद बक्षी-लक्ष्मीकांत प्यारेलाल जोडीची गाजलेली रचना. चित्रपटाचं शीर्षक गीत आहे आणि निसर्गाच्या सान्निध्यातील ‘फील गुड‘ घटक अधोरेखित करतो. याच गीत-संगीत जोडीचं ‘हाथी मेरे साथी’ यात (1971) राजेश खन्ना-तनुजावर चित्रित आणि किशोर-लतांनी मजेत गायलेले ‘सून जा आ ठंडी हवा’ हे बिनधास्त गाणं. आनंद बक्षी ‘गोरा और काला’मध्ये (1972) हेमा मालिनी आणि लताजांच्या माध्यमातून ‘धीरे धीरे बोल कोई सून ना रे’…(आपल्या प्रेमाचा लगेच बोभाटा करू नका) असा राजेंद्र कुमारला सल्ला देतात.

सचिन देव बर्मन यांची पण ‘सून’ शब्दावरून अर्थपूर्ण गाणी आहेत. विजय आनंदचा देव-नूतन-ओम प्रकाश-हरिंद्रनाथ चट्टोपाध्याय या अभिनेत्यांबरोबर साकारलेला ‘तेरे घर के सामने’ एक मजेदार आणि संगीतप्रधान चित्रपट. ‘सून ले तू दिल कि सदा’ असे गात देव आनंद रफीच्या माध्यमातून नूतनला आपल्या प्रेमाची साक्ष देतोय, तर ‘जाल’मध्ये (1952) देव आनंद गायक हेमंत कुमारच्या आवाजातून गीता बालीला साद घालतोय…‘ये रात ये चांदनी फिर कहाँ, सून जा दिल की दास्तान’. 50च्या दशकात सांगितिक ‘आरपार’च्या (1954) च्या अफाट लोकप्रियतेमधून संगीतकार ओंकार प्रसाद नय्यरनी आपला जम बसवला होता. ‘सून सून जालीमाँ’ या रफी-गीता दत्तच्या गाण्यांनी पडद्यावर गुरुदत्त – श्यामाचे प्रेम फुलत होते. अभिनेता जॉय मुखर्जींनी निर्मिती, दिग्दर्शन क्षेत्रात हात घातला ‘हमसाया’मधून (1968). मात्र चित्रपट साफ पडला आणि जॉय कर्जबाजारी झाला. आपण गायलेल्या ‘दिल कि आवाज भी सून’ या गाजलेल्या गाण्याचे मानधन गायक रफींनी जॉय मुखर्जांना परत केलं.

‘दिल-ए-नादान’मध्ये (1953) गायक तलत मेहमूद नायक होते तर श्यामा नायिका. संगीत गुलाम मोहम्मद यांचे निराश, हताश परिस्थितीत ‘जिंदगी देने वाले सून’ हे नायक तलत मेहमूदनी स्वत गायलेलं आणि पडद्यावर साकारलेलं गाणं आजही ऐकलं जात. पाश्चात्त्य सुरावटीतून सुरू होऊन हे गाणं राग भूपमध्ये परिवर्तित होतं. मात्र हताश, निराश न होता ‘जिंदगी’बरोबर दोन हात करायला शिकविणारं ‘यही वो कहानी है जो तुझको सुनानी है, जिंदगी आ रहा हूँ मैं’ असं म्हणत अनिल कपूरनी ‘मशाल’मधल्या (1984) गाण्यांमधून या गाण्याला जणू चपखल उत्तर दिलं.

शेवटी ‘बोलणे’ आणि ‘ऐकणे’ विषयाच्या संदर्भात एका वेगळ्या गाण्याचा परामर्श घेणे अगत्याचे आहे. यात कुठेही ‘सून’ किंवा ‘ऐकणे’ शब्द नाही, पण आशय आहे ‘श्रवण’. गुलजार यांचा संवेदनशील चित्रपट ‘कोशिश’ (1972). यातील ‘सोजा बाबा मेरे’ हे अंगाई गीत गात आहेत दृष्टिहीन ओम शिवपुरी. अपार कृतज्ञतेचे आणि आनंदमिश्रित समाधानाचे भाव फक्त आपल्या बोलक्या डोळ्यांतून आणि प्रखर अभिनयातून व्यक्त करतात मुलाचे मुके-बहिरे आई-बाप… हरी (संजीव कुमार) आणि आरती (जया भादुरी). एक विलक्षण प्रसंग प्रेक्षकांचे डोळे ओले करून जातो. इथे ‘ऐकणं’ नाही. कारण पडद्यावरील कलाकार ‘ऐकू’ शकत नाहीत, पण ते आपल्या अंतरंगातून भावनांचं ‘श्रवण’ साध्य करतात आणि या प्रसंगातून ‘ऐकणं’ आणि ‘श्रवण’ यातील फरक अधोरेखित होतो.

‘बोलणे’ व ‘ऐकणे’ या नैसर्गिक क्षमतांमध्ये योग्य समतोल साधण्यावर अनेक विचारवंतांनी, समाजशात्र्यांनी मार्मिक विचार व्यक्त केले आहेत. श्रवण म्हणजे कलाकुसरीचं शांतपणे विणणं. या आशयातून आजचे यशस्वी गायक जावेद अलीसुद्धा ‘श्रवणा’वर भर देतात. जे बोलण्याने वाढीला लागतात असे अनेक संघर्ष, संयम आणि श्रवण शक्तीतून टाळता येतात. आपल्याला बोलायला जिव्हा ‘एक’ आणि श्रवणप्रीत्यर्थ कान मात्र ‘दोन’ आहेत. यावरून विधात्याने आपल्या शरीराची रचना किती दूरगामी, विचारपूर्वक केली आहे ते दिसतं. बोलणं आणि ऐकणं यातील समीकरण हे क्रमश अर्धे आणि दुप्पट आहे. आपल्या वेदातसुद्धा श्रवण आणि मनन या क्रियांवर भर दिला गेला आहे, ज्यातून ब्रह्मज्ञान प्राप्त होतं. तेव्हा ‘वत्तेपणा कमी आणि श्रोत्याची भूमिका अधिक’ या उक्ती आणि कृतीतून आपले आणि समाजाचे जीवन अधिक समृद्ध होणे क्रमप्राप्तच आहे. कारण अंतत ज्ञान बोलके असते. मात्र शहाणपण नेहमी श्रवण करते हेच त्रिकालाबाधित सत्य आहे.

[email protected]
(लेखक संगीत अभ्यासक आहेत.)