दक्षिण काशी म्हणून परिचित असलेले हरिहरेश्वर ‘हिट अॅण्ड रन’च्या भयंकर घटनेने हादरले. भाडय़ाने रूम दिली नाही या किरकोळ कारणावरून पुणे येथून आलेल्या दारुडय़ा पर्यटकांनी ‘होम स्टे’मालकाला बेदम मारहाण केली. यावरच न थांबता त्यांनी ‘होम स्टे’मालकाच्या बहिणीला भरधाव स्कार्पिओखाली चिरडून ठार मारले. ज्योती धामणस्कर (34) असे मृत महिलेचे नाव आहे. शनिवारी मध्यरात्री दीड वाजता ममता रिसॉर्ट येथे ही भयंकर घटना घडली. ‘हिट अॅण्ड रन’नंतर मद्यधुंद तरुण अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले. यातील दोघा तरुणांना ग्रामस्थांनी पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले तर उर्वरित फरार आरोपींचा श्रीवर्धन पोलीस शोध घेत आहेत.
पुणे जिल्ह्यातील चिंचवड येथील इरप्पा धोतरे, आकाश उपटकर, आकाश गावडे, नीरज उपटकर, आशीष सोनावणे, विकी सिंग, अलीम नागूर, सचिन जमादार, आदील शेख, सचिन टिल्लू आणि अनिल माज हे 11 जण शनिवारी मध्यरात्री हरिहरेश्वरला आले होते. ममता ‘होम स्टे’ येथील अभी धामणस्कर यांच्याकडे त्यांनी राहण्यासाठी रूमची चौकशी केली. रूम दाखवल्यानंतर हे तरुण भाडय़ामध्ये बार्गेनिंग करू लागले. यावेळी सर्व तरुण दारूच्या नशेत असल्याचे लक्षात आल्यानंतर धामणस्कर यांनी रूम देण्यास नकार दिला. यामुळे मद्यधुंद तरुणांनी धामणस्कर यांच्याशी वाद सुरू केला. मोठमोठय़ाने आवाज येऊ लागल्याने धामणस्कर यांची बहीण ज्योती घरातून बाहेर आल्या. यावेळी सर्व मद्यधुंद तरुण अभी धामणस्कर यांना मारहाण करत होते. भावाला मारहाण होत असल्याचे पाहून मदतीसाठी शेजाऱयांना उठवण्यासाठी ज्योती आरडाओरड करत धावू लागल्या. याचवेळी मद्यधुंद तरुणांनी स्कार्पिओतून त्यांचा पाठलाग करत भरधाव गाडीखाली ज्योती यांना चिरडून ठार मारले. यानंतर अंधाराचा फायदा घेत सर्वजण पसार झाले.
पर्यटनाच्या नावाखाली नंगानाच
हरिहरेश्वर येथे ‘हिट अॅण्ड रन’मुळे एका निष्पाप महिलेचा बळी गेला. यामुळे सपूर्ण रायगड जिह्यात निषेध व्यक्त होत आहे. आरोपींना पकडून कठोर कारवाई झाली पाहिजे आणि ज्योती धामणस्कर पुटुंबीयांना न्याय मिळाळा पाहिजे, अशी मागणी नागरिक करीत आहेत. पर्यटनाच्या नावाखाली हातात दारूच्या बाटल्या घेऊन नंगानाच करणाऱया टोळक्यांमुळे पर्यटन स्थळे आणि देवस्थान या ठिकाणचे पावित्र्य धोक्यात आले आहे. पोलिसांचा वचक नसल्यामुळेच रायगडमधील पर्यटनाला गालबोट लागत असल्याचा संताप व्यक्त होत आहे.