हिंदुस्थानच्या टी-20 कर्णधारपदाचे निश्चित झालेय. टी-20 वर्ल्ड कपमध्ये अष्टपैलू कामगिरी करणाऱया हार्दिक पंडय़ाला हिंदुस्थानच्या टी-20 वर्ल्ड कपचे कर्णधारपद दिले जाणार असून उपकर्णधारपदासाठी मात्र शुबमन गिल किंवा सूर्यकुमार यादवपैकी एकाची वर्णी लागेल.
रोहित शर्माच्या निवृत्तीनंतर श्रीलंकेविरुद्धच्या आगामी टी-20 मालिकेसाठी हिंदुस्थानी संघाची सूत्रे कोणाच्या हातात देणार याकडे साऱयांचे लक्ष लागले होते. नुकत्याच झिम्बाब्वेविरुद्धच्या मालिकेसाठी हिंदुस्थानची यंग ब्रिगेड पाठविण्यात आली होती आणि याचे नेतृत्व गिलकडे सोपविण्यात आले होते. मात्र श्रीलंकेविरुद्ध टी-20 मालिकेसाठी हार्दिक पंडय़ाचे नाव निश्चित झाले असून तोच तीन टी-20 सामन्यात नेतृत्व करील. मात्र त्यानंतर होणाऱया तीन सामन्यांच्या वन डे मालिकेसाठी तो मायदेशी परत येणार आहे. अशा स्थितीत संघाचे नेतृत्व कुणाकडे असेल, हे स्पष्ट झालेले नाही.
बीसीसीआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार तो आता पूर्णपणे फिट आहे आणि तो संघाचा उपकर्णधारही होता. त्यामुळे आगामी मालिकेत तो कर्णधार असेल. येत्या 27 ते 30 जुलैदरम्यान तीन टी-20 सामन्यांची मालिका पाल्लेकेले येथे खेळविली जाणार आहे. त्यानंतर 2 ते 7 ऑगस्टदरम्यान वन डे मालिका खेळविली जाणार आहे. या मालिकेदरम्यान पंडय़ाने विश्रांती मागितल्यामुळे त्याच्या अनुपस्थितीत कुणाकडे नेतृत्व असेल, हे अस्पष्ट आहे. पण गिल किंवा सूर्यकुमारकडेच ही जबाबदारी असण्याची शक्यता आहे. कारण गेल्या काही महिन्यांत या दोघांनी काही सामने संघाचे नेतृत्वही केले आहे.
लंका दौऱ्यात सीनियर्सना विश्रांती
श्रीलंका दौऱ्यातही हिंदुस्थानची यंग ब्रिगेडच आघाडीवर असेल. आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर असताना खेळाडूंनी राष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेळावे असे आदेश बीसीसीआय सचिव जय शहा यांनी दिले आहेत, मात्र रोहित शर्मा, विराट कोहली, जसप्रीत बुमरा यांना यातून सूट देण्यात आली आहे. उर्वरित सर्व कसोटीपटूंनी ऑगस्ट महिन्यात किमान एक दुलीप करंडकाचा सामना खेळावा अशी बीसीसीआयची इच्छा आहे. यानंतर हिंदुस्थानी संघाला बांगलादेश आणि न्यूझीलंडविरुद्ध कसोटी मालिका खेळायची आहे.